Ticker

6/recent/ticker-posts

वाशिममध्ये सोमवारी ‘दादा आणि पांडू हवालदार’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता प्रमोद शेलार आणि कलावंताचे सादरीकरण


वाशिम, दि. २२ मार्च - मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर विनोदी अभिनेते स्व. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या गाजलेल्या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘दादा आणि पांडू हवालदार’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वाशिम येथील स्वागत लॉन, मन्नासिंह चौक, पुसद नाका येथे सोमवारी, दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे.
    सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे (भा. प्र. से.) यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम साकारला जात आहे. दादा आणि पांडू हवालदार या नाटिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता प्रमोद शेलार आणि कलावंत आपल्या कलेच्या सादरीकरणातुन स्व. दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. यामध्ये त्यांचे गाजलेले संवाद, लोकप्रिय गाणी आणि मनोरंजक सादरीकरणासह विविध कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये : सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रमोद शेलार यांच्या नेतृत्वाखाली विशेष नाट्यप्रयोग. दादा कोंडके यांच्या चित्रपटांतील लोकप्रिय गाणी, संवाद आणि विनोदी दृश्यांचे सादरीकरण. रंगतदार नृत्य, संगीत आणि अभिनयाचा मिलाफ
    या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद रसिक प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.