वाशिम - स्वतंत्र महामंडळाच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांचा आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने शिवा अखिल भारतीय वीरशैव - लिंगायत युवक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भातील शासन आदेश ९ ऑगष्ट रोजी जारी झाला असून यामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेची पुर्तता झाली आहे. या महामंडळात पहिल्या वर्षी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हे महामंडळ राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाशी संलग्न राहील. शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून शिवा संघटना वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. वीरशैव - लिंगायत समाजातील सुशिक्षित बेरोजगार बांधवांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी यासाठी शिवा संघटनेच्या माध्यमातून संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी २५ वर्षांपासून शासनासोबत लढा दिला. अखेर शासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सोबतच महाराष्ट्र शासनाचे समाज बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील हजारो, लाखो बेरोजगार तरुणांना स्वतंत्र व्यवसाय, उद्योग उभा करण्यासाठी कर्ज उपलब्ध होणार असून यायोगे समाजाचा आर्थिक विकास साधल्या जाणार आहे.