Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) चे अनेक फायदे : यात सहभागी होवून आपले भविष्य उज्वल करा - एनसीसी अधिकारी अमोल काळे : महाराष्ट्र असाधारण राजपत्रात पोलीस शिपाई पदासाठी एनसीसी असल्यास बोनस गुणाचा निर्णय


वाशिम - विद्यार्थी दशेपासुन राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसीमध्ये सहभागी झाल्यामुळे देशभक्तीचे बाळकडु पाजल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीसीचे सैनिक बनुन आपल्या मायभूमिचे ऋण फेडावे असे आवाहन श्री बाकलीवाल विद्यालयातील एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी केले आहे.
    काळे पुढे म्हणाले की, एनसीसी म्हटलं की डोळ्यासमोर युनिफॉर्म घालून शिस्तबद्ध संचलन करणारे एनसीसी कॅडेट्स येतात. केवळ लष्करात जाण्याची संधी म्हणून एनसीसीकडे पाहिले जाते. परंतु संशोधन, शिक्षण संस्था आणि उद्योग या क्षेत्रात जाण्यासाठीही विद्यार्थ्यांना एनसीसी कॅडेटचे कौशल्य प्राप्त असण्याची गरज आहे. मात्र याबाबत विद्यार्थी अजुनही अनभिज्ञ आहेत. शालेय शिक्षणात एनसीसी विभागात असलेल्या विद्यार्थ्यांना ‘ए’ ’बी’आणि ‘सी’ प्रमाणपत्राचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये एनसीसीच्या लाभाबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब मध्ये २ मार्च २०२२ रोजी नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश सुधारणा नियमाअंतर्गत एनसीसी क प्रमाणपत्र असल्यास परिक्षेच्या एकूण गुणांच्या ५ टक्के अधिकचे बोनस गुण मिळतील. तसेच एनसीसी ब प्रमाणपत्र धारकाला परिक्षेच्या एकूण गुणांच्या ३ टक्के तर अ प्रमाणपत्र धारकाला परिक्षेच्या एकूण गुणांच्या २ गुण मिळणार आहेत. तसेच लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये अधिकारी किंवा जवान म्हणून काम करण्याची संधी मिळते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अतिरिक्त तीन गुण मिळतात. पॉलिटेक्निक महाविद्यालयात पंधरा जागा राखीव असतात. राज्यस्तरावर नेतृत्व करणार्‍या एनसीसी कॅडेटला अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा जागा राखीव असतात. 


 

आयटीआयच्या प्रवेशासाठी अतिरिक्त गुण, पॅरामिलिट्री फोर्समध्ये दहा गुण, टेलिकम्युनिकेशन भरतीमध्ये अतिरिक्त १० गुण, पोलीस भरतीमध्ये बोनस गुण, बीएसएफ, सीआरपीएफ आयटीबीटी, एसएसबी, सीआयएसएफ भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळतात. शिवाय ‘सी’ प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केल्यावर खाजगी क्षेत्रात संरक्षण अधिकारी म्हणून संधी मिळते. एनसीसी सैनिकांमध्ये शिस्त आणि वेळेच्या काटेकोर नियोजनामुळे देशाला एक जबाबदार नागरीक व सैनिक मिळतो. त्यामुळे आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी हे फायदे लक्षात घेवून जास्तीतजास्त संख्येने एनसीसी अभ्यासक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अमोल काळे यांनी केले आहे.