
वाशिम - शहरातील पाटणी चौकाच्या खालोखाल सर्वात जास्त रहदारीचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दिघेवाडी दरम्यानच्या न.प. रस्त्यावर एकही गतीरोधक नसल्यामुळे दररोज वाहनधारकांमध्ये किरकोळ ते मोठे अपघात होत आहेत. वाद झाल्यानंतर समजंस नागरीकांकडून ते मिटविल्या जातात. मात्र काही वेळेस दोन विशिष्ट धर्मिय वाहनधारकांचे अपघात ़झाल्यानंतर तणावसदृष्य परिस्थिती निर्माण होते. शा़ळकरी मुलांसाठी एकमेव रहदारीचा मार्ग असलेल्या या रस्त्यावर विशिष्ट अंतराने शासन नियमानुसार गतीरोधकाची निर्मिती करावी अशी मागणी या परिसरातील नागरीकांकडून नगर परिषदेकडे प्रकर्षाने केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. आंबेडकर चौक ते दिघेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर अनेक मोठी हॉस्पीटल आहेत. डॉ. आंबेडकर चौकात राणी लक्ष्मीबाई शाळा, दिघेवाडीजवळ कानडे स्कुल, न.प. उर्दू स्कुल आहे. तर महालक्ष्मी पेट्रोल पंप रस्त्यावर श्री शिवाजी हायस्कुल आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन दररोज हजारोच्या संख्येने शाळकरी मुले मुली सायकल, मोटर सायकल वा पायदळ जाणेे येणे करत असतात. त्यातच विठ्ठलवाडीसमारुन पाटणी चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पेट्रोलपंप, कृषी सेवा केंद्रे, रिलायन्स मॉलसह इतर लहान मोठी दुकाने झाली आहेत. वाहनधारकांना पेट्रोल भरण्यासाठी तसेच पाटणी चौकाकडे शॉर्टकटने जाण्यासाठी हाच रस्ता सोयीस्कर पडत असल्याने डॉ. आंबेडकर चौक ते पाटणी चौक या मुख्य रस्त्याच्या खालोखाल विठ्ठलवाडी समोरुन पाटणी चौकाकडे जाणार्या रस्त्याचा वाहनधारक मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने या रस्त्यावर गर्दी वाढली आहे. या रस्त्यावरुन इतकी रहदारी वाढुनही रस्त्यावर कुठेही गतीरोधक नसल्याने वाहनधारकंाच्या वेगावर कुठेही नियंत्रण राहीले नाही. त्यामुळे दररोज येथे दोनचाकी व चारचाकी वाहनांचे छोटे मोठे अपघात होत आहेत. या अपघातादरम्यान आतापर्यत अनेकजण जखमी झाले आहेत. अनेक वादही झाले आहेत. मात्र शहरातील समंजस लोकांच्या मध्यस्तीने हे वाद मिटविल्या गेले आहेत.
मात्र अशा अपघातात एखादा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला किंवा त्याचा मृत्यु झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरीकांमधून विचारला जात आहे. काही वर्षाआधी स्कुटी व चारचाकीच्या अपघातात वाद विकोपाला जावून शस्त्र बाहेर निघाली होती.
काही महिन्यापुर्वी अपघाताची मालीका कमी व्हावी या हेतूने जागरुक नागरीकांनी वर्गणी करुन पेट्रोलपंप रस्त्यावर गतीरोधक उभारले होते. मात्र गतीरोधकाची उंची वाजवीपेक्षा जास्त झाल्यामुळे एक नागरीकाचे वाहन या गतीरोधकामुळे अपघातग्रस्त होवून या नागरीकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे हे गतीरोधक काढून टाकण्यात आले.
मात्र दरदिवशी अपघात घडूनही नगर परिषदेला या रस्त्यावर तातडीने गतीरोधक उभारावे वाटत नसल्याने नगर परिषदेच्या कर्तव्यदक्षतेप्रती नागरीकांमध्ये आश्चर्य व चिड व्यक्त होत आहे.
किमान शाळकरी मुले व महिलांची सुरक्षितता लक्षात घेवून डॉ. आंबेडर चौक ते दिघेवाडी दरम्यान ठराविक अंतराने तसेच विठ्ठलवाडी समोरुन पेट्रोलपंपाकडे जाणार्या रस्त्याच्या वळणावर लवकरात लवकर शासन नियमानुसार व ठराविक उंचीने गतीरोधक उभारुन रहदारीला आश्वस्त करावे अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.