
वाशिम दि 22 (जिमाका) जिल्ह्यात आधारकार्डनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 12 लाखापर्यंत आहे. परंतु अद्यापही बहुतांश लोकांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक जोडणे बाकी आहे.लहान मुलापासून ते सर्व व्यक्तींच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे.
आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडण्याची फायदे पुढीलप्रमाणे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अद्यावत करणे आवश्यक आहे. वाहन परवाना, आयकर परतावा, पॅन कार्ड, वन नेशन वन रेशन (रेशनकार्ड),पासपोर्ट, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, घरकुल योजना, निराधार योजना, फसल बिमा योजना यासारख्या अनेक योजनांसाठी आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अद्यावत असणे किंवा जोडला असणे आवश्यक आहे. 31 मार्चपूर्वी आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडले तर भविष्यात सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येणार नाहीत. भारतीय डाक विभागामार्फत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडण्याचे शिबिर 23 ते 31 मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. एखाद्या गावामध्ये किंवा विशिष्ट नगरामध्ये एकत्रपणे 1000 लोकांपेक्षा जास्त नागरिकांना आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करावयाचा असल्यास डाक विभागामार्फत विशेष व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी 942279 6996 श्री. गजानन काळे यांच्या मोबाईलवर एक दिवस आधी बुकिंगसाठी फोन करावा. त्यानुसार नियोजन ठिकाणी आवश्यक कर्मचारी पाठविण्यात येतील.ही सुविधा 31 मार्चपर्यंत विशिष्ट पातळीवर राबविण्यात येत आहे.
आधारकार्ड, संबंधित मोबाईल आणि सरकारमान्य अत्यंत माफक फी रुपये 50 सोबत आणावी. तरी लहान मुले-मुली,तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी आपल्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक त्वरित जोडून घ्यावा. असे आवाहन भारतीय डाक विभागाच्या वाशीम कार्यालयाने केले आहे.