
वाशिम - विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान ५ वर्ष सेवा झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच कामगार केंद्रामध्ये या पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहे. गुणवंत कामगार पुरस्काराने ५१ कामगारांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रूपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या १० वर्षानंतर कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. एका कामगाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून ५० हजार रूपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणारे साखर कारखाने, सुतगिरणी, लहान मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्स कंपनी, शॉपिंग मॉल्स, वाहतूक कंपन्या, एस. टी. महामंडळ, वीज कंपनी, बी. एस. एन. एल., दुध संघ, कापूस पणन महासंघ, एल.आय.सी., जीवन प्राधिकरण, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, कारखाना कायद्याअंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शॉप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदीत आस्थापनामध्ये काम करणारे कामगार कर्मचारी यांना मंडळातर्फे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते.
मंडळाचा लीन नंबर लेबर आयडेंटीटी नंबर असलेल्या कामगारांना www.public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी प्रिंट व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे. त्याआधारे अर्जदारास संबंधित केंद्रातून अर्जाचा नमुना मोफत दिला जाईल. सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयास २८ फेब्रुवारी पर्यंत हस्तपोच / टपालाद्वारे सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील ३ वर्षात बंद पडलेल्या आस्थापनांतील कामगारांना संबंधित केंद्रात ऑफलाईन पद्धतीने मंडळाच्या नियमानुसार अर्ज सादर करता येणार आहे, असे केंद्र संचालक, कामगार कल्याण केंद्र, वाशिम यांनी कळविले आहे.