वाशिम - मोठी लोकसंख्या व जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण म्हणून नावलौकीक असलेल्या रिसोड शहरातील गुन्हेगारीवर वचक व सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या रिसोड पोलीस स्टेशनची इमारत सद्यस्थितीत मोडकळीस आली असून ठिकठिकाणी सदर इमारत जीर्ण झाल्यामुळे या इमारतीत राहुन कायदा व सुव्यवस्थेचा कारभार राहणार्या पोलीस बांधवांचा जिव धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती पोलीस निवासस्थानाची झाली असून इमारत बांधकाम व दुरुस्तीच्या मुद्यासाठी दलित पँथर संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण साबळे व जिल्हा सरचिटणीस वासुदेव गायकवाड यांनी यासंदर्भात ९ फेब्रुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, रिसोड पोलीस स्टेशनची इमारत मोडकळीस आली असून अधिकारी तथा पोलीस कर्मचार्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली पोलीस निवाससस्थानाची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे निवासस्थाने असूनही बाहेरगावावरुन बदली होवून आलेल्या पोलीसांना इतरत्र रुम भाड्याने घेवून राहावे लागत आहे. तसेच घर भाड्याने मिळत नसल्यामुळे अनेक पोलीसांना दुसर्या गावावरुन ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पोलीसांना येण्याजाण्याचा त्रास व कर्तव्यावर पोहचण्यास उशीर होत आहे. आपातकालीन परिस्थितीत रात्रपाळीमध्ये काम करणार्या पोलीसांना आरामाची नितांत आवश्यकता असते. परंतु मोडकळीस आलेल्या पोलीस निवासस्थानामुळे ते आपल्या परिसरासह ते तेथे राहू शकत नाहीत. त्यामुळे या निवासस्थानाची दुरुस्ती व सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. या बाबीचा विचार करुन पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामासह पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घेण्यात यावे अशी मागणी दलित पँथर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष शे. हमीद शे. रऊफ, रिसोड तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष विजय बाजड, मालेगाव तालुकाध्यक्ष सुरेश बाजड, ब्रम्हानंद पारधे, श्रीकिसन सोनुने आदी उपस्थित होते.