Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : उद्योजकता विकास केंद्रातर्फे कारंजा येथे 20 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण


वाशिम, दि. 08 (जिमाका) :
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिमच्या वतीने जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींकरीता ब्युटी पार्लर/ फॅशन डिझाईनिंग/ कॉम्प्युटर हार्डवेअर/ कॉम्प्युटर टॅली/ कॉम्प्युटर डिटीपी जॉबवर्क/ पापड लोणचे/शेळी, गाय, म्हैस पालन/ कुक्कुट पालन/ मसाले निर्मिती यावर आधारीत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत मॅजिक कॉम्प्युटर, मंगरुळपीर रोड, बायपास, कारंजा येथे करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश उद्योजकतेचे सुप्त गुण असलेल्या युवक व युवतींना शोधून त्यांच्या मधील सुप्त उद्योजकीय गुणांचा पध्दतशीरपणे आखलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामधून विकास करुन स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराच्या विविध उद्योग संधीबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय उद्योजकता प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, उद्योग संधी शोधणे, उद्योग व्यवसायाची उभारणी, उभारणीचे विविध टप्पे, उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध शासकीय कर्ज योजना, कर्ज प्रकरणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेचे व्यवहार, हिशोब लेखे इत्यादीबाबत तज्ञ व अधिकारी यांचेकडून या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी किमान 8 वी इयत्ता पास व स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वयंरोजगार निर्माण करु इच्छीणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील युवक-युवती व महिलांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी पुरुषोत्तम ठोंबे (9822108023) किंवा प्रविण राऊत (9763808678) मॅजिक कॉम्प्युटर, मंगरुळपीर रोड, बायपास, कारंजा येथे 19 फेब्रुवारीपूर्वी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिमचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.