Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : साडेचार लाखाच्या टायरचोरी प्रकरणाचा तपास कासवगतीने : तक्रारदार हवालदील : शहर पोलीसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

वाशिम - स्थानिक साईलिलानगर येथील रहिवासी शिवकुमार यादव यांच्या शेतात उभ्या असलेल्या टिप्परची बारा चाके (किंमत साडे चार लाख रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्यांच्या तक्रारीला महिला उलटून गेला असून अद्यापही शहर पोलीस त्या अज्ञात चोरट्यांचा तपास लावू शकले नाहीत. त्यामुळे लाखो रुपयाच्या चोरीप्रकरणी तक्रारदार यादव हवालदील झाले आहेत. त्यामुळे यादव यांनी शहर पोलीसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवकुमार यादव यांचे साईलिलानगर स्थित शेत आहे. त्याठिकाणी त्यांनी स्वत:च्या मालकीचे तीन टिप्पर १७ डिसेंबरच्या रात्री उभे केले होते. १८ डिसेंबरला सकाळी ते शेतात गेले असता तीनही वाहनांचे एकूण १२ टायर अज्ञात चोरट्यांनी काढून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या चोरीमुळे यादव यांचे सुमारे साडेचार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यादव यांनी १८ डिसेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द तक्रार दिल्यानंतर चोरट्यांवर भांदवीचे कम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक धनराज तायडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र महिना उलटून केला तरीही अद्याप या चोरीप्रकरणाचा तपास अत्यंत कासवगतीने सुरु असल्यामुळे तक्रारदार हवालदील झाले आहेत. यासोबतच शहरात वाढत्या चोरीचे सत्रामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असल्याचे दिसून येत आहे. मात्र चोरी प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या संथगतीमुळे नागरीक पोलीसांच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करीत आहेत. शहर पोलीस स्टेशन तत्कालीन ठाणेदार धृवास बावनकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रफीक शेख यांनी पदभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वाशिमकर जनतेच्या आशाअपेक्षा उंचावल्या आहेत. शहरात झालेल्या चोरी प्रकरणाच्या तपासात गती आणून चोरट्यांना जेरबंद करुन मुद्देमाल मिळवून द्यावा अशी मागणी पिडीत नागरीकांमधून होत आहे.