वाशिम, दि. 18 (जिमाका) : भारतीय डाक विभागाच्या वतीने मुलींचे भविष्य उज्जवल करण्याची संधी देते. पोस्ट विभागामध्ये लहान बचत योजनांची विस्तृत श्रेणी केली आहे. कन्या समृध्दी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ मुलींसाठी आहे आणि ती बेटी बचाओ बेटी पढाओचा एक भाग म्हणून सुरु करण्यात आली आहे. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागविण्यासाठी ही योजना आहे. 10 वर्षाखालील मुलींसाठी किमान 250 रुपयेसह खाते उघडले जाऊ शकते. 17 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत वाशिम जिल्हयाअंतर्गत येणाऱ्या पोस्ट कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याची विशेष मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सदस्य लाभार्थी ओळखून आणि जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये एसएसवाय खाते उघडून 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी 250 रुपये योगदान देऊ शकतात. तसेच एसएसवाय खाते उघडल्यानंतर आपण आयपीपीबी खात्यामार्फत आपले पुढील भरणा ऑनलाईन पध्दतीने भरु शकता. फक्त 250 योगदान दया आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिवा लावा. तरी जिल्हयातील सर्व नागरीकांना मुलीच्या उज्जवल भविष्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते फक्त 250 रुपयात उघडण्यात येत असल्याचे आवाहन डाक विभाग वाशिमचे उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.
मुलींना बचतीसाठी सुकन्या समृद्धी योजना
देशातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि संबंधित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसै मिळावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने २०१५ पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत भारतातील कोणत्याही टपाल कार्यालयात (पोस्ट आॅफीस) मुलीच्या नावे खाते उघडावे लागते. या खात्यावर दरमहा किमान १०० रुपयांपासून रक्कम जमा करता येते. यानुसार या खात्यावर प्रत्येक वर्षी कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. या जमा रकमेवर प्रचलित व्याज दरानुसार व्याज देण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय कमाल दहा वर्ष किंवा त्याच्या आत असणे आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर १४ वर्षे दरमहा निश्र्चित केलेली बचतीची रक्कम खात्यावर जमा करणे अनिवार्य आहे.
एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येतो. तीन वर्ष बचत केल्यानंतर या जमा रकमेवर नियमानुसार कर्ज मिळू शकते. मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर हे खाते बंद करता येते. तोपर्यंत खात्यावर जमा झालेली रक्कम व्याजासह मुलीच्या पालकाला देण्यात येते. याच जमा रकमेतून मुलीच्या लग्नासाठी खर्च करता येऊ शकेल, ही या योजनेच्या अंमलबजावणीमागची केंद्र सरकारची भावना आहे. पोस्ट आॅफीस व्यतिरिक्त देशातील विविध २८ बँकांमध्येही ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- योजना पात्रता निकष :-
- मुलीचे वय दहा वर्षांच्या आत असावे.
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना लाभ घेता येतो.
- जुळ्या मुली असतील तर, संबंधित दोन आणि अन्य एका मुलीचे खाते उघडता येते.
- दरवर्षी किमान एक हजार आणि कमाल दीड लाख रुपये बचतीचीची मुभा.
- पोस्ट आॅफीसमध्ये किंवा निश्र्चित केलेल्या बँकेत खाते उघडणे अनिवार्य.
- निश्र्चित तारखेला दरमहा बचत जमा करणे बंधनकारक.
- आवश्यक कागदपत्रे :-
- विहित नमुन्यातील अर्ज.
- मुलींच्या जन्म तारखेचा पुरावा.
- जुळ्या मुली असल्यास, त्याबाबतचा सक्षम पुरावा.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- ओळखीबाबातचा पुरावा.
- अर्ज कोठे कराल?
याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज बचत खाते उघडण्यासाठी करावा लागतो. हे बचत खाते जवळच्या पोस्ट आॅफीसमध्ये किंवा निश्र्चित करुन दिलेल्या २८ बँकापैकी कोणत्याही एका बँकेत उघडता येते.