Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड : रा.कॉ. तालुकाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यावरील कारवाईच्या नाराजीने तालुक्यातील पदाधिकारी राजीनामे देणार - नंदु पाटील काठोळे रा.कॉ. तालुका उपाध्यक्ष


रिसोड -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रिसोड तालुकाध्यक्ष तेजराव पाटील वानखेडे यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील रा.कॉ. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत असून यामुळे तालुुक्यातील अनेक पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देणार असल्याची माहिती रा.कॉ. तालुका उपाध्यक्ष नंदु पाटील काठोळे यांनी १८ जानेवारी रोजी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाव्दारे दिली आहे. पत्रकाव्दारे काठोळे म्हणाले की, तेजराव वानखेडे यांनी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर स्वत:च्या सर्कलमधुन रा.कॉ. चे पं.स. सदस्य निवडून आणून तालुक्यात पक्षाचा जनाधार वाढविला आहे. ते स्वत: कृउबास समिती संचालक झाले. त्यामुळे बाजार समितीमध्ये पक्षाची स्थिती मजबुत झाली आहे. तालुक्यात त्यांच्या दांडगा जनसंपर्क व वाढती लोकप्रियता पाहून पक्षाने त्यांना २०१४ मध्ये तालुकाध्यक्षाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर त्यांनी राज्यात पक्षाचे सरकार नसतांना सुध्दा तालुका पिंजुन काढता पक्षाचे स्थान मजबुत केले. शेकडो नाराज व दुरावलेल्या कार्यकर्त्याची दिलजमाई घडवून त्यांना पक्षाच्या झेंडयाखाली एकत्र आणले. अनेक नवे कार्यकर्ते जोडले व पक्ष मोठा केला. परंतु स्थानिक पंचायत समितीमध्ये त्यांनी सभापतीपद खेचून आणले ही बाब स्थानिक नेत्यांच्या जिव्हारी लागली व पक्षश्रेष्ठीला त्यांच्याविरुध्द उलटसुलट सांगून त्यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यास भाग पाडले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महविकास आघाडीविना सत्ता स्थापन झाल्या आहेत. परंतु त्याठिकाणी कार्यरत अकार्यक्षम पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली नाही. परंतु स्थानिक रिसोडचे नेते पक्ष संपुष्टात आणण्याच्या मार्गावर आहेत. तेजराव पाटील वानखेडे यांनी आपल्या कार्यकौशल्यातुन तालुक्याला राष्ट्रवादी पक्षाची विशाल मोट बांधली आहे. तसेच रा.काँ. चा एक सदस्य असतांना सौ. केसरबाई हाडे यांना सभापती केले. अशा कर्तव्यदक्ष पदाधिकार्‍याला पदावर कायम ठेवण्यासाठी तालुक्यातील त्यांचे खंदे समर्थक आणि पदाधिकारी पुढे आले आहेत. वानखेडे यांना पुन्हा पदबहाली न दिल्यास सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध सेलचे पदाधिकारी आपले राजीनामे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्याकडे सोपवतील. तसेच निष्ठावान कार्यकर्ते स्थानिक नेत्यांची मनमानी खपवून घेणार नाहीत असे रा.कॉ. तालुका उपाध्यक्ष नंदु पाटील काठोळे यांनी नमूद केले आहे.