वाशिम - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय विश्रामगृह २८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या संघटनेच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत करुन विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष अमोल देशमाने, प्रा. देवानंद बोन्ते, राजकुमार बोनकिले, अमोल कापसे, अमोल खेलूरकर, स्वप्निल जिरवणकर, दत्ताप्पा चवरे, दीपक मिटकरी, प्रा. जनकवाडे यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात बोलतांना अभय कल्लावार म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांचे शुद्ध चरित्र समाजासमोर आणणे, नांदेड येथे उभारण्यात येणार्या शिवासृष्टीचे आजीवन सभासद नोंदणी करणे व राज्यातील शिवा संघटनेची गाव शाखा नवयुवकांच्या हाती सोपवून पुनर्रचना करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी जिल्ह्यातील शिवा संघटनेतील विविध आघाड्यांचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक मिटकरी, शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा उपाध्यक्षपदी किरण जिरवणकर, जिल्हा सचिवपदी अंबादास टोपले, जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष परसवार, व्यापारी महासंघाच्या जिल्हा सरचिटणीसपदी अतुल एकघरे, कर्मचारी महासंघाच्या जिल्हा सरचिटणीसपदी आनंद पेन्टे, विद्यार्थी आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी सुरज गणेकर, महिला आघाडीच्या कारंजा तालुका प्रमुखपदी सौ. रत्नप्रभा विभुते, वाशिम तालुका सोशल मिडीया प्रमुखपदी प्रणव पत्ते, मालेगाव तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी गणेश परांडकर, विद्यार्थी आघाडी वाशिम तालुका उपाध्यक्षपदी कपिल रासकर, वाशिम शहर प्रमुखपदी आकाश आलमवार, मंगरूळपीर तालुका उपप्रमुखपदी श्रेयश परमा आदींची निवड करुन त्यांना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
बैठकीला वाशिम, काटा, किन्हीराजा, कोठारी, पिंपळगाव ईजारा, सनगाव येथील शिवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक अमोल देशमाने यांनी, सूत्रसंचालन दत्ताप्पा चवरे तर आभारप्रदर्शन अमोल कापसे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.