Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना व ओमिक्रॉन संसर्ग पार्श्वभूमिवर 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरा करावा

वाशिम, दि. 03 (जिमाका) : कोविड विषाणू व ओमिक्रॉन नविन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे, असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य आहे. यावर्षी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी एका आदेशाव्दारे कोविड- 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून 6 डिसेंबर 2021 रोजी परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टिकोणातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरा करावा. कोविड- 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. कोविड आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग लक्षात घेता शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर मुंबई येथील कार्यक्रमाचे दूरदरर्शनवरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे. सर्व अनुयायांनी चैत्यभूमि येथे न जाता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे. अभिवादन करावयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ, पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येवू नये. सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नये. कोविड- 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे कोटेकोरपणे पालन सर्व नागरीकांनी करावे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे. असे मानण्यात येईल. व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.