Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : जिल्हयात लस न घेतलेल्या 38 व्यक्तींना दंड : लसीकरणाबाबत अफवा पसरविणारे तसेच लस घेण्यापासून रोखणारे व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा कलम 353 अन्वये कारवाई


वाशिम, दि. 03 (जिमाका) : जिल्हयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाने विविध यंत्रणांना सोबत घेवून सर्व पात्र व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. तर दुसरीकडे काही व्यक्ती गैरसमजूतीमुळे लस घेण्यापासून दूर आहे. पात्र सर्वच व्यक्तीचे लसीकरण करणे शासनाने बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनात आज 3 डिसेंबर रोजी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना लस न घेतलेल्या नागरीकांना दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्या निर्देशानुसार लस न घेतलेल्या 38 व्यक्तींना दंड आकारण्यात आला. लसीकरणाबाबत दंड केलेल्या 38 प्रकरणी एकूण 16 हजार 300 रुपये दंड आकारण्यात आला. उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांनी 15 प्रकरणी 3 हजार रुपये दंड, उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी 7 प्रकरणी 3 हजार 500 रुपये दंड, वाशिम तहसिलदार यांनी 5 प्रकरणी 5 हजार 500 रुपये दंड, रिसोड तहसिलदार यांनी 2 प्रकरणी 1 हजार रुपये दंड, मंगरुळपीर तहसिलदार यांनी 4 प्रकरणी 800 रुपये दंड आणि कारंजा तहसिलदार यांनी 5 प्रकरणी 2 हजार 500 रुपयाचा दंड लस न घेतलेल्या व्यक्तीकडून वसूल केला. यापुढेही लस न घेतलेल्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर निश्चितपणे दंड आकारला जाणार आहे. मानोरा तालुक्यातील कुपटा येथे नागरीकांना लस घेण्यापासून रोखणारे व जाणून बुजून लसीकरणाबाबत अफवा पसरविणारे दोन व्यक्ती निदर्शनास आले. तहसिलदार मानोरा यांनी त्या दोन व्यक्तींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा त्या दोन व्यक्तींनी ऐकले नाही. त्या दोन व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश कारंजा उपविभागीय अधिकारी राहूल जाधव यांनी पोलीसांना दिले. यापुढे लसीकरणाबाबत अफवा पसरविणारे तसेच लस घेण्यापासून रोखणारे जे व्यक्ती आढळून येतील. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम 353 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर देशात ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक पात्र नागरीकाने कोविड लस घेवून आपले आरोग्य सुरक्षित राखावे. तसेच नियमित मास्कचा वापर करणे, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे आणि हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसुत्रिचा वापर नागरीकांनी करावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.