वाशिम - रिसोड रस्त्यावरील पाच मैल फाट्यापासुन खंडाळा, अडोळी, जुमडा ते मराठवाड्यातील भगवती, तपोवन, कडोळी व गोरेगाव हा ग्रामीण भागातील डांबरी रस्त्याची भयावह दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या या दुर्दशेमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांना होणार्या या त्रासाकडे राष्ट्रऋषी नानाजी देशमुख प्रतिष्ठाणने पुढाकार घेत थेट केंद्रीय रस्ते वाहतुक व दळणवळण मत्री ना. नितीन गडकरी यांना रस्ता रुंदीकरणासह सिमेंटीकरणाच्या मंजुरातीची मागणी केली आहे. प्रतिष्ठाणचे सचिव शशिकांत देशमुख यांनी यासंदर्भात १४ नोव्हेंबर रोजी ना. गडकरी यांना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, पाचमैल फाट्यापासुन जुमडा रस्त्यावरील अनेक गावातील ग्रामस्थांना बाजाहाटासह, शासकीय तसेच रुग्णालयाच्या कामासाठी वाशिमला यावे लागते. त्यातच विदर्भ मराठवाड्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या व जुमडा गावाच्या लगत असलेल्या भगवती, कडोळी, तपोवन, गोरेगाव या गावातील ग्रामस्थही खरेदीसाठी जवळ असल्यामुळे वाशिमलाच येणे पसंत करतात. त्यामुळे वाशिमच्या बाजारपेठेच्या आर्थिक विकासाला आपोआपच चालना मिळते. त्यातच कडोळी हे गाव भारतरत्न नानाजी देशमुख यांचे मुळ गाव असल्यामुळे भारताच्या नकाशावर पुढे आले आहे. या गावाच्या विकासासाठी केंद्र सरकारने विशेष निधी देवून अनेक विकासात्मक उपक्रम गावात सुरु केले आहे. तसेच नानाजी देशमुख यांचे कडोळी हे जन्मगाव असल्यामुळे या गावात भारतभरातून राजकीय व सामाजीक मान्यवर भेटी देत असतात. मात्र राज्यरस्ता क्रमांक २५८ मधील प्रजीमा ३० अशी ओळख असलेल्या गोरेगाव, कडोळी, भगवती व जिल्हामार्ग ५३ असलेल्या जुमडा, अडोळी ते पाचमैल या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अशातच हा एकेरी रस्ता असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुुरुस्ती व रुंदीकरणासह दिर्घकाळ टिकणार्या सिमेंटीकरणाची आवश्यकता आहे. भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्मगावाचे महत्व व ग्रामस्थांना होणारा त्रास पाहून या रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंटकरणासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी राष्ट्रऋषी नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत देशमुख यांनी ना. गडकरी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.