केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी
करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल 10
रुपयांनी स्वस्त होणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने हा
निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज मध्यरात्री
12 वाजल्यापासून हा दर लागू होणार आहे. मागील तीन महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले
होते. सध्या महाराष्ट्रात पेट्रोल 115 रुपयांच्या वर गेला होता. तर
डिझेलनेही शंभरी ओलांडली होती. ऐन सणाच्या दरम्यान धान्य, किराणा,
यांच्यासोबतच पेट्रोलनेही सर्वासामान्यांचा खिसा कापला होता.
सध्या मुंबईत पेट्रोल 115.85 आणि डिझेल 106.62 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल 115.66 आणि 104.78 रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 116.06 आणि105.17 रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल 115.65 आणि डिझेल 104.81 रुपये तर कोल्हापुरात पेट्रोल 115.91 आणि डिझेल 105.06 रुपये आहे. आज औरंगाबादमध्ये सर्वाधिक म्हणजेच पेट्रोल 117.37 रुपये आणि डिझेल 106.44 रुपये प्रति लिटर आहे.
शेतकऱ्यांनाही फायदा
केंद्र सरकारने पेट्रोलपेक्षा डिझेलवरील उत्पादन शुल्क दुप्पटीने कमी केल्याने डिझेल थेट 10 रुपयांनी स्वस्त झालंय. याचा फायदा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी होणार आहे. याचसोबत केंद्राप्रमाणे राज्यांनाही दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असं केंद्राने म्हटलंय.
देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला होता. गेल्या दीड वर्षात पेट्रोल तब्बल ३६ रुपयांनी तर डिझेल २६.५८ रुपयांनी महागले आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून डिझेलही शंभरीच्या पुढे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असून त्याचा परिणाम आपल्याकडेही दिसत आहे. देशभरातील १२ हून अधिक राज्यांत डिझेलची शंभर रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. विशेष म्हणजे कच्च्या तेलाचे दर हे १९ डॉलर प्रती बॅरल इतक्या नीचांकी पातळीवर पोचल्यावरही सरकारने इंधनावर उत्पादन शुल्क वाढवले होते. त्यानंतर आता हाच दर ८५ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. तरीही पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ३२.९ रुपये प्रति लिटर कायम आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क हे ३१.८ रुपये प्रति लिटर आहे.