वाशिम - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर लिहीलेल्या २०२१ कवींच्या कवितांसह जिल्हयातील ४५ कवींच्या कविता समाविष्ट असणारे व शब्ददान प्रकाशन संस्था नांदेडचे प्रा. अशोकुमार दवणे संपादीत ‘महामानव’ या जगातील पहिल्या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन आज, बुधवार २० ऑक्टोंबर रोजी वाशीमसह राज्यातील ३६ जिल्हयात एकाच दिवशी प्रकाशन होत आहे. निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत असल्याची माहिती हरिश्चंद्र पोफळे, विष्णू लोंढे, विद्या सरपाते, भक्तीदास सुर्वे, दीपक ढोले, रामदास जाधव यांनी दिली आहे.
ग्रंथाविषयी अधिक माहिती देतांना पोफळे यांनी सांगीतले की, या महाकाव्यग्रंथात केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या कवितांचाच समावेश असून आजपर्यत महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रकाशित होणारा वर्ष २०२१ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील कवितांचा हा एकमेव काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहाचा सामाजीक, सांस्कृतीक, साहित्यीक, संशोधक यांना उपयोग होणार आहे. या महाकाव्य ग्रंथात तीन पिढ्यातील कविंच्या कवितांचा समावेश आहे. निश्चितच भविष्यकाळामध्ये या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर होईल. संपादकांनी हा ग्रंथ भदंत प्रा. सुमेधबोधी महास्थवीर, भदंत विनयबोधीप्रिय थेरो, भदंत ज्ञानरक्षित थेरो यांना अर्पण केला आहे.
या ग्रंथामध्ये वाशिम जिल्हयातील ४५ कविंच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रा. डॉ. भाऊराव तनपुरे, महेन्द्र ताजणे, अनिल कांबळे, शेषराव धांडे, हरिश्चंद्र पोफळे, प्रा. सिद्धार्थ इंगोले, प्रा.नंदू वानखडे, दीपक ढोले, विलास अंभोरे, डॉ. विजय काळे, विष्णू लोंढे, भीमराव शृंगारे, प्रकाश सावळे, सपना गुजर, विशाल भगत, उज्ज्वला मोरे, जनार्दन भगत, धम्मानंद इंगोले, प्रज्ञानंद भगत, राहुल कांबळे, समाधान खिल्लारे, कविनंद गायकवाड, राजू सोनोने, संदीप कांबळे, दादाराव अवचार, दत्ता शेळके, भक्तीदास सुर्वे, मधुराणी बनसोड, विमल वाघमारे, स्वाती इंगळे, चाफेश्वर गांगवे, पां.ऊ.जाधव, अरविंद उचित, हंसिनी उचित, कनिष्क पडघान, जावेद धनु भवानीवाले, ग. ना. कांबळे, प्रा. दिलीप वानखडे, युवराज टोपले, सुरेश शृंगारे, विद्या सरपाते, डॉ. विकल पंडित, टी.जी. गायकवाड, मनोहर दुपारे, यशवंत गुळदे या कवींच्या कवितांचा समावेश आहे. जगातील पहिल्या असणार्या व मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणार्या या महाकाव्यग्रंथांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नोंद होण्यासाठी वाटचाल सुरु झाली असून समाजबांधवांसाठी ही गौरवाची बाब असल्याचे प्रा. पोफळे यांनी नमूद केले आहे.