Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : असंघटीत कामगारांची सी.एस.सी मार्फत ऑनलाईन नोंदणी करावी : निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे


वाशिम, दि. 12 (जिमाका) : केंद्र शासनाने असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने 31 डिसेंबर 2008 रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारीत केला आहे. त्याअनुषंगाने बिडी कामगार, मच्छिमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार या सारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टलचे उदघाटन करण्यात आले आहे. राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार आहे. सद्यस्थितीत एनडीयुडब्यू अंतर्गत नोंदणीकृत कामगारांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा या वर्षाचा 12 रुपये विमा हप्ता केंद्र शासनामार्फत भरण्यात येणार आहे. विविध यंत्रणांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी/असंघटीत कामगार/ कंत्राटी कर्मचारी वर्ग यांची नोंदणी www.eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. काही शंका किंवा तांत्रिक अडचणी असल्यास सामान्य सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक, महावीर साळवे (9623204894) व श्री. नवनाथ टोनपे (7972888970) यांच्याशी संपर्क करावे. जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद खान (9326772447) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कार्यालयामध्ये असलेल्या असंघटीत कामगार/कंत्राटी कर्मचारी यांनी नोंदणीकरीता वरील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करुन असंघटीत कामगार यांचे शिबीराचे आयोजन करुन असंघटीत कामगारांची नोंदणी करुन घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.