वाशिम, दि. ०८ (जिमाका) : राज्यात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील विविध कोर्सेसमध्ये प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते आज, ८ जुलै रोजी ऑनलाईन स्वरुपात झाला. वाशिम जिल्ह्यात सुद्धा ३०० युवक-युवतींना या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम शुभारंभ कार्यक्रमात वाशिम येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांचेसह प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक डॉ. उमेश मडावी व डॉ. मोरे उपस्थित होते.
वाशिम जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय येथे ‘डायबेटीस एज्युकेटर’ आणि ‘फ्लेबोटॉमिस्ट’ या कोर्सेसमध्ये तर लाईफ लाईन हॉस्पिटल येथे ‘जनरल ड्युटी असिस्टंट - ऍडव्हान्स्ड' याविषयी प्रशिक्षणासाठी एकुण ४० उमेदवारांची बॅच सुरू करण्यात आली. तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना कीटचे वाटप करण्यात आले.