Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : युवा गिर्यारोहक यश इंगोलेच्या जिद्दीला जिल्हाधिकार्‍यांचे आर्थिक पाठबळ : १ लक्ष ७० हजाराची मदत : आफ्रिकेतील सर्वात उंच ‘किलीमांजारो’ शिखर चढणार : कळसुबाई शिखरावर दोनदा चढाई : वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला


वाशिम, दि. ०९ : वाकाटककालीन ऐतिहासिक राजधानी असलेला वाशिम जिल्हा अनेक नररत्नांची खाण आहे. या भूमिमध्ये अनेक गुणवंतांनी जन्म घेवून आपल्या कलागुणांची चमक दाखवून सातासमुद्रापार झेप घेतली असून जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या नररत्नामध्ये वाशिम येथील यश मारुती इंगोले या १९ वर्षीय युवा गिर्यारोहकाचे नाव जुळले असून यशची आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ (उंची : सुमारे ५८९२ मीटर) शिखरावर चढाई करण्यासाठी निवडलेल्या चमूमध्ये निवड झाली आहे. युवा जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस. यांनी विविध शासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने १ लक्ष ७० हजाराचा भरीव निधी यशला देवून त्याच्या जिद्दीला आर्थिक पाठबळ दिले आहे. यशने प्रशिक्षणादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ५४०० फुट उंचीच्या ‘कळसुबाई’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर त्याने दोन वेळा यशस्वी चढाई केली आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगामधील १८ किल्ले तसेच ३ समुद्री किल्ल्यांवर सुद्धा चढाई केली आहे हे विशेष. नावातच यश असलेल्या यशच्या या यशामुळे आईवडीलांचा मानसन्मान व किर्ती वाढली असून वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
    आजच्या डिजीटल युगात टाळेबंदीमुळे शाळा बंद असतांना मुले अभ्यास व इतर कलागुणांची जोपासना न करता केवळ मोबाईलवर आपला वेळ वाया घालवत आहेत. या पार्श्वभूमिवर केवळ १९ वर्षाच्या वयामध्ये काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात बाळगलेल्या यशचे हे यश त्याच्या वयातील मोबाईलच्या आहारी गेलेले समस्त युवक आणि मुलांच्या कलागुणांकडे दुर्लक्ष करणार्‍या त्यांच्या मातापित्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.


    आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ हे सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे यशने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांना लेखी पत्राद्वारे आर्थिक मदतीची विनंती केली. शिक्षणासोबतच वेगळा छंद जोपासत यशने आतापर्यंत केलेले गिर्यारोहण आणि त्याची जिद्द पाहून जिल्हाधिकार्‍यांनी त्याला मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. विविध शासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने ८ जुलै रोजी त्याला १ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला. तसेच त्याला ‘किलीमांजारो’ शिखरावर यशस्वी चढाई करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    गिर्यारोहणाची आवड असलेल्या यश इंगोले याने यापूर्वी हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान १५ हजार फुट यशस्वी चढाई केली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ५४०० फुट उंचीच्या ‘कळसुबाई’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर त्याने दोन वेळा यशस्वी चढाई केली आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगामधील १८ किल्ले तसेच ३ समुद्री किल्ल्यांवर सुद्धा चढाई केली आहे.
    आफ्रिका खंडातील सर्वोच्च ‘किलीमांजारो’ शिखरावर ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार्‍या गिर्यारोहण मोहिमेसाठी यश इंगोले याची निवड झाली आहे. या मोहिमेसाठी त्याला सुमारे ३ लक्ष ५४ हजार रुपये खर्च येणार आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे एकरकमी इतके पैसे जमविणे शक्य नसल्याने यश याने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांना पत्र लिहून आपल्या गिर्यारोहण मोहिमेसाठी शासनामार्फत मदतीची विनंती केली होती.
    आजकाल पालक आणि मुलांकडून पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्व दिले जात आहे. विविध कला, क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलत आहेत. अशा काळात शिक्षणासोबतच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगत यश इंगोले याने गिर्यारोहणाचा जोपासलेला छंद आणि त्याने या क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल जिल्हाधिकार्‍यांनी घेतली. त्याला पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी त्याच्या ‘किलीमांजारो’ गिर्यारोहण मोहिमेसाठी मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगरपरिषद आणि मालेगाव, मानोरा नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या सहकार्याने जमा झालेली १ लक्ष ७० हजार रुपये रक्कम जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते यशला सुपूर्द करण्यात आली. काही व्यापारी, व्यावसायिकांनी सुद्धा यशला मदत केली.