Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम : वृध्द कलावंतांच्या समस्यांसाठी विदर्भ लोककलावंत संघटना आक्रमक : बेमुदत धरणे आंदोलनाचा शासनाला इशारा

 


वाशिम - गेल्या दोन वर्षापासून रखडलेली वृध्द साहित्यीक कलावंत लाभार्थी मानधन निवड समितीची बैठक तातडीने घेण्यासह कारंजा तालुक्यातील मानसिक व शारीरीकदृष्ट्या खचलेले वृध्द कलावंत श्रीमती कांताबाई लोखंडे व सुरेश हांडे या कलावंतांचे अनुदानाचे प्रस्ताव तातडीने मंजुर करुन त्यांना मानधन देण्याच्या मागणीसाठी विदर्भ लोककलावंत संघटना आक्रमक झाली आहे. शासनाने कलावंतांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा १ डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाव्दारे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, सन २०१९ पासून समाजकल्याण विभागाने जिल्हयातील वृध्द साहित्यीक मानधन लाभार्थी निवड समितीची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे वृध्दापकाळात शासनाच्या मानधनाचा एकमेव आधार असणार्‍या अनेक वृध्द कलावंतांचे अनेक प्रस्ताव धुळखात पडले आहेत. २२ मार्च २०१९ पासून करोना महामारीमुळे लोककलावंतांची खुप उपासमार होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून कलावंतांची होणारी उपासमार रोखण्यासाठी जिल्हयात मानधन समिती त्वरीत स्थापन करुन बैठकीव्दारे कलावंतांना मानधन मंजुर करावे. तसेच सन २०१७ पासून उपेक्षीत व निवड समितीने मुद्दाम दुर्लक्षित केलेले वृध्द कलावंत श्रीमती कांताबाई लोखंडे व सुरेश हांडे या कलावंतांना त्वरीत मानधन मंजुर करावे. शासनाचे ह्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने २५ जानेवारी २०२१ पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून शासनाने तत्पुर्वी कलावतांच्या समस्या निकाली काढाव्या अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सामाजीक न्यायमंत्री, सांस्कृतीक मंत्री, शासनाचे सचिव, सामाजीक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर सुरेश हांडे, श्रीमती कांताबाई लोखंडे, विजय ढळे, अजाब ढळे, नंदकिशोर कव्हळकर, विजय खंडार, शाहीर संतोष खडसे, लोमेश चौधरी, सौ. तुळसाबाई चौधरी, उमेश अनासाने, बाळकृष्ण काळे, प्रल्हाद भांडे, शेषराव इंगोले आदींच्या सह्या आहेत.