वाशिम - मागील वर्षी झालेल्या निवडणूकीनतंर मंत्रिमंडळ स्थापन झाले व नव्या पालकमंत्र्यांनी आपआपल्या जिल्हयाचा पदभार सांभाळला. मात्र निवडणूकीनंतर बरखास्त झालेल्या वृध्द कलावंत मानधन समिती, संजय गांधी निराधार समितीसह विविध शासकीय व अशासकीय समित्या अद्यापही स्थापन झाल्या नसल्याने विविध समाजघटकांवर याचा विपरीत परिणाम झाला असून अनेक प्रश्न व समस्या कायम आहेत. पालकमंत्र्यांनी या बाबीकडे लक्ष देवून या समित्या स्थापनेबाबत कार्यवाही सुरु करण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे. यासंदर्भात १ डिसेंबर रोजी जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात कडोळे यांनी म्हटले आहे की, जिल्हयाचे पालकत्व सांभाळत असलेले पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांची जनमानसात न्याय प्रतिमा आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात असणार्या अनेक समित्या नव्याने स्थापन न झाल्याने सर्वसामान्य नागरीकांची सर्व आवश्यक शासकीय कामे ठप्प पडली आहेत. व त्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. यासंदर्भात कलावंतांच्या हक्कासाठी कार्यरत विदर्भ लोककलावंत संघटनेने शासन, प्रशासनाला अनेक निवेदने देवूनही त्याची काहीच दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य घटकांना शासन, प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. व त्यांच्यात शासनाविरोधात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे आपण त्वरीत लक्ष देवून वृध्द साहित्यीक कलावंत मानधन लाभार्थी निवड समिती, संजय गांधी निराधार समितीसह इतर समित्यांचे गठन करण्यासंदर्भात त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी अध्यक्ष संजय कडोळे यांच्यासह पदाधिकार्यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सामाजीक न्यायमंत्री, सांस्कृतीक मंत्री, शासनाचे सचिव, सामाजीक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर सुरेश हांडे, श्रीमती कांताबाई लोखंडे, विजय ढळे, अजाब ढळे, नंदकिशोर कव्हळकर, विजय खंडार, शाहीर संतोष खडसे, लोमेश चौधरी, सौ. तुळसाबाई चौधरी, उमेश अनासाने, बाळकृष्ण काळे, प्रल्हाद भांडे, शेषराव इंगोले आदींच्या सह्या आहेत.