Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त कलावंतांची शासनाकडून घोर उपेक्षा : कलावंतांच्या महाचर्चा परिषदेत विविध ठराव पारित : आंदोलन छेडण्याचा इशारा

 


वाशिम - व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल शासनाकडून राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्काराच्या रुपाने पाठीवर शाबासकीची थाप मिळूनही या पुरस्काराच्या अधिकारापासून वंचित असलेल्या विदर्भाच्या सर्व जिल्हयातील पुरस्कारप्राप्त कलावंतांची महाचर्चा परिषद २९ नोव्हेंबर रोजी अकोला येथील महानगर पालीका सेवानिवृत्त शिक्षक संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली.
         या परिषदेला अध्यक्षस्थानी शिक्षक श्रीराम शेगोकार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक रामटेके, शाहीर संतोष खडसे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, राजेंद्र भटकर, सप्तखंजेरीवादक विजय पांडे, सुरेशचंद्र काळे, वसंत मानवटकर, खंडूजी सिरसाट, मधुकर नावकार, झिंगुलाई बोलके, श्रीकृष्ण राऊत, पंकजपाल राठोड, निलेश सोमाणी, ईश्वर मगर, खंडेराव मुंडे, निळकंठ बोरोडे यांची उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट संघटन कार्याबद्दल अशोक रामटेके यांचा राम शेगोकार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. परिषदेत पुरस्कारप्राप्त कलावतांच्या विविध समस्यांवर सांगोपांग चर्चा करुन सर्वानुमते विविध ठराव पारीत करण्यात आले. त्यामध्ये, कलावंतांना महामंडळाच्या बसेसमध्ये किलोमिटरची मर्यादा न ठेवता विनाअट मोफत प्रवासाची सवलत व आरक्षित आसन उपलब्ध करून मिळावे, पुरस्कारप्राप्त कलावंतांना वृद्धापकाळात उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दरमहा मानधन मिळावे,  पुरस्कार्थीची नावे समाज कल्याण कार्यालयात दर्शनी भागात लावावे, पुरस्कारार्थीना शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला आमंत्रित करून ध्वजारोहणाचा सन्मान मिळावा, पुरस्कार्थीचा मृत्यु झाल्यास त्यांचा अंतिम संस्कार शासकीय इतमामातच व्हावा असे ठराव पारीत करण्यात आले. या ठरावानुसार मागणीचा शासनाकडे पाठपुरावा करुन मागण्या मंजुर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आला. संचलन संजय कडोळे यांनी, प्रास्ताविक राम शेगोकार, मार्गदर्शन अशोक रामटेके व आभार प्रदर्शन संतोष खडसे यांनी केले.