Ticker

6/recent/ticker-posts

राजगृह चेतनास्थळावरील तोडफोड घटनेचा मनसेच्या वतीने तीव्र निषेध : दोषींना त्वरीत अटक करुन कठोर शासन करण्याची मागणी


वाशीम - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील निवासस्थान राजगृहावरील तोडफोड घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून या निंदनीय घटनेतील दोषींना शासनाने तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी १० जुलै रोजी मनसेचे प्रभारी जिल्हाप्रमुख मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
    निवेदनात नमूद आहे की, मंगळवार ७ जुलै रोजी दादर (मुंबई) येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह इमारतीवर काही अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करुन या दगडफेक व तोडफोड केली. याठिकाणी असलेल्या कुंड्यांची नासधूस केली. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कैद झाली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष व्यक्त केला आहे. राजगृह हे महाराष्टातील समस्त जनतेचे चेतनाकेंद्र असून याठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी काही काळ वास्तव्य केले होते. तसेच या इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या हजारो पुस्तकांचे संग्रहालय आहे. कोरोना संकट काळात जातीधर्मामध्ये वाद पेटवून देण्याच्या इराद्याने समाजकंटकांनी हे कृत्य केले असून महाराष्ट्रातील जनता समाजकंटकांचा हा डाव कधीही यशस्वी होवू देणार नाही. तसेच डॉ. बाबासाहेबांचे विचार हे कधीही नष्ट होवू शकत नाहीत. तरी शासनाने या गंभीर बाबीची दखल घेवून राजगृहावरील हल्ला प्रकरणाचा त्वरीत तपास करुन आरोपींना अटक करावी व त्यांना कठोरात कठोर शासन करावे जेणेकरुन पुन्हा भविष्यात अशी घटना होणार नाही असे नमूद केले आहे. निवेदनावर मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, माजी कृषी जिल्हाध्यक्ष अशोक नाईकवाडे, गजानन वैरागडे, रवि वानखेडे, अमोल गाभणे, अमोल मुळे, गजानन धोंगडे, रामदास आव्हाडे, धिरज पुरंदरे आदींच्या सह्या आहेत.