Ticker

6/recent/ticker-posts

वाढीव विजदेयकांसंदर्भात भाजपा आक्रमक; विज देयकांची केली होळी : वाढीव वीज देयके रद्द करेपर्यंत आंदोलन सुरू राहणार


मुंबई, दि.२४ जुलै - कोरोना लॉकडाऊन काळातही ग्राहकांना वाढीव वीजबिले पाठविणार्‍या बेस्टविरोधात भाजपाने आज अधिक आक्रमक भूमिका घेतली. भाजप प्रदेश कार्यालयासमोर आज आ.श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवकांनी वाढीव वीज देयकांची होळी केली. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ.श्री.प्रवीण दरेकर आणि आ.राहुल नार्वेकरदेखील उपस्थित होते. 
 यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ.श्री.मंगलप्रभात लोढा यांनी बेस्टने वाढीव देयके रद्द करावी आणि वीज खंडित करण्याच्या नोटिसा तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी केली. आ.श्री. मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की एमईआरसी च्या सुचनाना हरताळ फासत बेस्ट ने एमईआरसीचेच नाव घेत छुपी दरवाढ केली आहे. आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने असभ्य वर्तन की आहे. कालच्या आंदोलनात महिला नगरसेविकांसोबत पोलिसांनी ज्याप्रकारे असभ्य वर्तन केले त्याबाबत शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. 
 मुंबईतील प्रत्येक वॉर्डमधील बेस्ट कार्यालयासमोर वाढीव विजदेयकांची होळी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी बोलताना भाजप मुंबई अध्यक्ष आ.श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली. त्याचबरोबर विविध मार्गाने वाढीव वीज देयकांविरोधात भाजपचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना विधानपरिषद विरोधी पक्ष नेते आ.श्री.प्रवीण दरेकर यांनी वीज देयकांसंदर्भात शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. यावेळी आ.राहुल नार्वेकर म्हणाले की या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसले आहे. भाजपच्या महिला नगरसेविका राजश्री शिरवाडकर आणि स्वप्ना म्हात्रे यांनी पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी मुंबई उपाध्यक्ष हितेश जैन, मुंबई मनपा भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ता भालचंद्र शिरसाट हेदेखील उपस्थित होते.