Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक : राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ : स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा - शरद पवार


नाशिक दि. २४ जुलै - राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौर्‍यावर असून आज त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
 नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा शरद पवार यांनी घेतला. तसेच त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवादही साधला.
 भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही मुंबई येथील स्थिती अधिक वाईट आहे. अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात कोरोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले.
 राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत असे करून चालणार नाही.जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही सरकारची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
 शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील गरजू कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर  या महागड्या औषधांची उपलब्धता करून ५० औषधे जिल्हाधिकार्‍यांच्या सुपूर्द केली. याआधी देखील २५ औषधे देण्यात आली होती तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी नेहमीच पुढाकार घेण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
 आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटदेखील मोठे आहे. राज्यात नामांकित औद्योगिक केंद्रे आहेत. ही केंद्रे सुरू करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.
 स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाला केले. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी भूमिका कोणी घेऊ नये.
 आतापर्यंत विशेषतः महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाने बासी ईद, रमजान ईदच्या वेळेस अतिशय समंजसपणाची भूमिका घेतली. याचे उत्तम उदाहरण मालेगाव आहे. त्यामुळे असेच सहकार्य यापुढेही असेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.