Ticker

6/recent/ticker-posts

शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करा अन्यथा आंदोलन - मनिष डांगे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा


वाशीम - एकबुर्जी धरणात मुबलक पाणीपुरवठा असतांना ऐन पावसाळ्यात गेल्या अनेक दिवसापासून शहरवासीयांना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ८ ते १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे अतोनात हाल होत आहेत. न.प. प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देवून शहराला २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा करुन नागरीकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. मनसेचे प्रभारी जिल्हाप्रमुख मनिष डांगे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
    निवेदनात नमूद आहे की, वाशीम शहरवासीयांसाठी नगर पालीकेच्या वतीने जुने नळ कनेक्शन कालबाह्य ठरवून नविन नळ कनेक्शन जवळपास १० हजार रुपये डिपॉझीट घेवून प्रत्येक कुटुंबाकडून घेण्यात आले. हे नळ कनेक्शन घेतांना २४ तास पाणीपुरवठा केला जाईल असे नगर पालीकेकडून सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर आजपर्यत वाशीम शहरवासीयांना या नव्या नळामधून ८ ते १० दिवसाआड प्रभागाला पाणीपुरवठा होत आहे. व अनेक वेळा शहरवासीयांना गढूुळ व दुषीत पाणीही नागरीकांना प्यावे लागले आहे. जुन्या नळाचा पाणीकर ८०० रुपये वर्ष होता. मात्र आता नागरीकांना नव्या नळासाठी वर्षाचे २ हजार रुपये पाणीकर भरावा लागत आहे. त्यामानाने नागरीकांना दररोज तर सोडाच परंतु आता ८ ते १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागातील नागरीक नगर पालीकेच्या या कारभाराला वैतागले असून नागरीकांना अव्वाच्या सव्वा पैसे देवून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. या प्रकारामुळे नगर पालीकेत मनमानी कारभार चालत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी या गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष देवून शहरातील नागरीकांना कमीत कमी २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, माजी कृषी जिल्हाध्यक्ष अशोक नाईकवाडे, गजानन वैरागडे, रवि वानखेडे, अमोल गाभणे, अमोल मुळे, गजानन धोंगडे, रामदास आव्हाडे, धिरज पुरंदरे आदींच्या सह्या आहेत.