Ticker

6/recent/ticker-posts

सरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार : खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु : ग्रामविकास मंत्र्यांच्या सुचना : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना संपूर्ण वेतन


सरपंचांना प्रलंबित मानधन लवकरच मिळणार : खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु : ग्रामविकास मंत्र्यांच्या सुचना : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना संपूर्ण वेतन
मुंबई, दि. ९ - राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. सरपंचांचे प्रलंबीत मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
 सरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्याबाबत शासनाने नुकतेच शासन निर्णय निर्गमित केले आहेत. सरपंचांना सध्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार प्रतिमाह ३ ते ५ हजार रुपये इतके मानधन देण्यात येते. सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित असून ते तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या होत्या.
ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना संपूर्ण वेतन
 कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट चालू आर्थिक वर्षासाठी शिथील करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेले चांगले काम तसेच लॉकडाऊनच्या काळात घटलेली करवसुली पाहता हा निर्णय घेण्यात आला. या कर्मचार्‍यांनाही त्यांचे संपूर्ण वेतन देण्याची कार्यवाही राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. प्रस्तुत वेतन हे संबंधीत ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती श्री.मुश्रीफ यांनी दिली.