Ticker

6/recent/ticker-posts

‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप नागरीकांच्या संरक्षणासाठीच : कोरोनाविषयी परिपूर्ण माहिती, बचाव व मार्गदर्शन


‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप नागरीकांच्या संरक्षणासाठीच : कोरोनाविषयी परिपूर्ण माहिती, बचाव व मार्गदर्शन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाशी संबंधित माहिती, आजूबाजूला असलेल्या कोरोना बाधित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूची जोखीम कितपत आहे, याची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू’ अ‍ॅप लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असून जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू’ अ‍ॅप आपल्या ऍन्ड्रॉईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
 सध्या कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असून त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहून योग्य खबरदारी घ्यावी, यासाठी हे आरोग्य सेतू’ अ‍ॅप मार्गदर्शन करेल. सर्व भारतीय भाषांमध्ये सदर अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू’ अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करते. कोरोना बाधित व्यक्ती आपल्या आस-पास आल्यास हे अ‍ॅप वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते.  
 आरोग्य सेतू’ अ‍ॅपमध्ये कोविड-१९ बाधेची स्वः चाचणी सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, शारीरिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे किंवा काय करू नये, याबाबतची प्रमाणित माहिती दिली जाते. स्वः चाचणीमध्ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्यास त्याला तात्काळ १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याबाबत सुचविण्यात येते. आपल्या आजूबाजूला असलेल्या कोरोना बाधित व्यक्तींची माहिती तसेच राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फोन मध्ये ’आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.
’आरोग्य सेतू’चा असा करा वापर
 आयओएस आणि ऍन्ड्रॉईड फोनवर हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करावा. त्यानंतर ब्लुटूथ आणि लोकेशन ऑन करावे. त्यात सेट लोकेशन  ऑलवेज’ असे ठेवावे. आपल्याला आवश्यक असलेली भाषा त्यावर नमूद केल्यास त्या भाषेमध्ये सर्व माहिती आरोग्य सेतू’द्वारे उपलब्ध होते. अ‍ॅपमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे स्पष्टपणे दिल्यास आपल्यामध्ये कोविडच्या आजाराची लक्षणे आहे का? याची माहिती देखिल लगेच मिळते. यासह इतर आजारांविषयी देखिल त्यावर माहिती मिळत असल्याने हे अ‍ॅप लोकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.