Ticker

6/recent/ticker-posts

२००७-२०११ बॅचमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील १०८ माजी विद्यार्थ्यानी सिएम कोविड निधीत दिले १ लाख १८ हजार रुपये : सोशल मिडीयावरुन आवाहन करुन उभारला मदतनिधी


२००७-२०११ बॅचमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील १०८ माजी विद्यार्थ्यानी सिएम कोविड निधीत दिले १ लाख १८ हजार रुपये : सोशल मिडीयावरुन आवाहन करुन उभारला मदतनिधी
वाशिम - डॉ. पंजाबराव देशमुंख कृषी विद्यापीठात वर्ष २००७ ते २०११ या वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी राज्यावर आलेल्या कोरोना संकटसमयी आपली जबाबदारी ओळखून तब्बल १ लाख १८ हजार ८११ रुपयाची आर्थिक मदत मुख्यमंत्री कोविड फंडामध्ये ऑनलाईन जमा केली आहे. या मदतीची महाराष्ट्र शासनाने दखल घेवून पाच वर्षातील प्रत्येक बँचच्या ग्रुपला आभाराचे पत्र पाठविले आहे.
 कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी शासन व प्रशासन युद्धस्तरावर काम करीत असून सामाजिक बांधिलकी व राज्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिकेव्हीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी ‘खुंखार लेकरं व कॉलेज कट्टा’ या व्हाट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला ग्रुपमधील सहकार्‍यांनी एकमेकांशी चर्चा करून त्वरित शासनाला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे निश्चित केले. या मोहिमेमध्ये १०८ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत फक्त दोन दिवसामध्ये तब्बल ११८८११ जमा करून १ मे महाराष्ट्र दिनी ही सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ऑनलाईन स्वरूपात पाठविण्यात आली. या मोहिमेत २००७-११ बॅचच्या  सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्वानुमते सहभाग घेत राज्य सरकारला मदत करून एक आदर्श निर्माण केला असून अशाप्रकारे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठासह इतर ही विद्यापिठाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे या अगोदर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या तीन बॅचने सुद्धा राज्य सरकारला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. आतापावेतो पिकेव्ही च्या माजी विद्यार्थ्यांकडून सरकारच्या खात्यात २ लाख ६२ हजार ६११ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून याबाबत महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत आभाराचे पत्र प्रत्येक ग्रुपला पाठविले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.