Ticker

6/recent/ticker-posts

युवकांना व्यायामासाठी अटी व शर्तीनुसार हेल्थ क्लब व जिमला परवानगीची मागणी : वाशीम जिल्हा जिम असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


युवकांना व्यायामासाठी अटी व शर्तीनुसार हेल्थ क्लब व जिमला परवानगीची मागणी
वाशीम जिल्हा जिम असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
वाशीम - कोरोना आजाराचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून  जिल्हयातील व्यायामशाळा, हेल्थ क्लब व जिम बंद आहेत. यामुळे युवकांच्या व्यायामाला खिळ बसली असून व्यायामासाठी लाखो रुपयाचे कर्ज काढून उभारण्यात आलेले हे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर या व्यवसायावर विसंबुन असलेल्या विविध घटकांवर उपासमारीची पाळी आली आहे. व्यवसायीकांना या संकटातुन बाहेर काढण्यासाठी तसेच युवकांना नियमित व्यायाम करता यावा म्हणून लॉकडाऊनच्या नियम व शर्तीनुसार व्यायामशाळा, हेल्थ क्लब व जिम उघडण्यास परवानगी देण्याची मागणी वाशीम जिल्हा जिम असोसिएशनच्या वतीने २६ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
    निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हयात गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या आधीपासून म्हणजे गेल्या १५ मार्चपासून प्रशासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयासह जिम (हेल्थक्लब) बंद करण्यात आले आहेत. हे जिम शासनाच्या आदेशानुसार अद्यापही बंदच आहेत. बंद असलेल्या या जिममुळे नियमित व्यायाम करुन आपले आरोग्य अबाधीत ठेवणार्‍या युवकांच्या व्यायामाची समस्या निर्माण झाली आहे. जिल्हयातील विविध जिममध्ये विविध शारीरीक स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी येत असतात. परंतु सद्यस्थितीत जिम बंद असल्यामुळे त्यांना व्यायाम करता येत नाही. याशिवाय बेरोजगार युवकांनी लाखो रुपये बँकेचे कर्ज काढून जिम उघडले आहेत. जागा भाड्याने उभारण्यात आलेल्या या जिममध्ये विविध मशीनरी आणण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यापासून हे जिम बंद असल्यामुळे जिम संचालक जिम भाडे, इलेक्ट्रीक बिल, मेन्टनंन्स आदी भरु शकत नसून त्यांची ही या लॉकडाऊनमध्ये मोठी उपासमार सुरु आहे. तसेच इतर घटकांप्रमाणे शासनाकडून या जिमचालकांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. नियमित व्यायाम बंद असल्यामुळे युवकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या अडीच महिन्यानंतर वाशीम जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये आला असून परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध शिथील करुन विविध कार्यालये, आस्थापना, दुकाने आदींना विशिष्ट वेळेमध्ये उघडण्यास परवानगी दिली आहे. वरील सर्व बाबींचा प्रशासनाने सहानुभुतीने विचार करुन लॉकडाऊनचे नियम व अटीसह जिल्हयातील जिम (हेल्थ क्लब) विशिष्ट कालावधीत उघडण्यास परवानगी देण्यात यावी. शासनाने आदेश दिल्यास सर्व जिम चालक मास्कचा वापर, सैनिटायझरचा वापर व सामाजीक अंतराचे भान ठेवून शासनाच्या नियमानुसार विशिष्ट वेळेमध्ये जिम सुरु ठेवू असा प्रशासनाला विश्वास देतो. अशी मागणी वाशीम जिल्हा जिम असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर फिटनेस झोन प्लसचे आशिष ठाकूर, एस. फिटनेस क्लबचे सुधीर गिरी, श्री साई हेल्थ क्लबचे आनंद भावसार, पेंढारकर फिटनेस क्लबचे नितीन पेंढारकर, यशवंत जिमचे राहुल शिरसाट, द मसल ब्लॅडेंड फिटनेस क्लबचे मोहन परवरे, महाकाली फिटनेस क्लबचे मंकेश माळी, जय मल्हार हेल्थ क्लबचे संतोष मुरकुटे आदींच्या सह्या आहेत.