Ticker

6/recent/ticker-posts

विशेष लेख : अन्यथा कोरोना गावात शिरेल : लेखक - सिध्दार्थ दामोदर भगत


विशेष लेख


अन्यथा कोरोना गावात शिरेल !
---------------------------
लेखक
सिध्दार्थ दामोदर भगत
मसोला बु. ता. मंगरुळपीर जि.वाशीम 
मो. ७८७५०८०५७४
---------------------------
             कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या कवटीत घेतलेलं आहे या कवटीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक देश यातुन सुटका करण्यासाठी दमछाक होतानां दिसत आहे. तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून कोरोनाचे विषाणू नष्ट करण्यासाठी प्रत्येक देश प्रशंशनिय कार्य करीत आहे. कोरोनाला हद्द पार करण्यासाठी काही थोडा वेळ लागेल परंतु कोरोना हद्द पार होणार म्हणजे होणार यात तिळमात्र शंका नाही . कोरोना विषाणूचे संकट उदभवल्यानंतर शहरी नगरामध्ये विषाणुचे तांडव निर्माण झाले. दरदिवशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने कामगार मजुरा समोर मोठे संकट निर्माण झाले. हाताला काम नाही पोटाला अन्न नाही तर लॉकडाऊन मध्ये जगायचं कसं ! लॉकडाऊन कधी संपणार... ते सांगता येणार नाही या धास्तीने आपले गावच बरं  म्हणून पोट भरण्यासाठी शहरात आलेला कामगार मजुर हे गावी परत जाण्यासाठी आक्रोश करीत होते. परंतू लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे हे अशक्यच होते. जेथे आहे तेथेच राहा. घरातच राहा सुरक्षित रहा हे वेळोवेळी सरकार तर्फे सुचना येत होत्या. या सूचनांचे योग्य प्रकारे पालन होत असले तरी भुकेच्या आगेने जीव कोणाचाही थांबत नव्हता. प्रत्येक दिवस संकटाचाच उजाडत होता. पिंजर्‍यात अटकलेला उंदीर बाहेर पडण्यासाठी तडफडतोय मी मरतो की वाचतो हे भय अशीच अवस्था कामगार मजूरांची झालीं होती.
 राज्य सरकारने मजुरांना गावी परतण्यासाठी केंद्राकडे रेल्वे बसगाड्या सुरू करण्याबाबत परवानगीची मागणी केली. त्याबाबत केंद्राचे नियोजन करणे सूरू होते. उपासमारीचे जिवन जगतांना जास्त दिवस यातना सहन करने अशक्य होत होते. म्हणुन आपल्या गावी आपल्या राज्यात जाण्यासाठी मजुरांनी उठाव सुध्दा केला. दर दिवशाला शहरी भागात कोरोना पॉझिटव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोटभरण्यासाठी शहरात आलेले कुटुंब, कामगार व मजुर यांच्यावर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने ४४ दिवसा नंतर मजुरांना रेल्वे बसगाड्या सुरू करून गावी परतण्यासाठी परवानगी दिली. हया कालावधीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कोणावर कसा किंवा नकळत कोणाच्या संपर्काने संसर्ग झाला असेल ही शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून घरी परत असतांना तपासणी करने बंधनकारक आहे हे प्रशासनाने कळविले. परंतु नुकताच संसर्ग झाला असेल किंव्हा घरी परत असतांना कोणाशी संपर्कात येऊन विषाणू ची बाधा होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने कोरोना गावात शिरेल करिता ग्रामस्थ सुजाण नागरिकांनी वेळीच सतर्क रहाणे गरजेचे आहे. 
 घरवापसींना घरांत प्रवेश करण्याअगोदर गावात १४ दिवस कॉरंन्टाईन राहणे बंधनकारक केले असल्याने प्रशासन विभागाने गावातील शाळा, कॉलेज, सभागृह आणि इतर सुविधा काॉरन्टाईनसाठी निर्माण केल्या आहेत. शेवटी गावातील  ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील आणि इतर जबाबदार नागरिक यांच्या सतर्कतेवर अवलंबून आहे. तशी नैतिक जबाबदारी म्हणून आपण स्वत:हून घरवापशीनी कॉरन्टाईन होणे गरजेचे आहे. ज्या गावात तंतोतंत प्रत्येक घरवापशी १४ दिवस कॉरंन्टाईन होत असेल आणि काळजीपुर्वक गावात सुरक्षितता बाळगल्यास कोरोना गावात शिरुच शकणार नाही. परंतु काही गावात घरवापशी बांधव कॉरन्टाईन न होता सरळ आपल्या घरात प्रवेश करुन गावात सुध्दा मोकळेपणाने वावरतात ही मोठी धोकादायक बाब आहे. तसेच काही घरवापसी दोन तिन दिवस घरात प्रवेश करतात मग कॉरन्टाईन होतात तर काही ठिकाणी कॉरन्टाईनसाठी वादीवाद होतात हा सुध्दा प्रकार गंभीर आहे. विषाणू एवढा भयंकर आहे की कधी आणि कशाप्रकारे संसर्ग होईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे सुरक्षितता पाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. ह्याकडे दुर्लक्षितपण केला तर विषाणूचे भुतं मानगुटीवर कधी बसेल हे कळणारच नाही. त्यामुळे जागरुक राहणे गरजेचे आहे. शहरातुन आलेला श्रीमंत व्यक्ती सरळ घरात प्रवेश करुन गावात वावरतो त्याला कॉरन्टाईन म्हणण्याची कोणी हिम्मत करत नाही हा सूध्दा गावातील गंभीर प्रकार आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणाला अडथळा येऊ शकतो या उद्देशाने काही ठिकाणी कॉरन्टाईनसाठी दुर्लक्षितपणा केला जातो. सदर गंभीर प्रकारामुळे ग्रामिण भागात कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 कालपर्यंत शहरी आणि मोठ्या नगरामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले संपूर्ण रुग्णांची संख्या ही शहरातीलच होती. ग्रामिण भागात एकही रूग्ण नव्हता तशी परिस्थिती सुध्दा नव्हती. रोज नित्यनियमाने शेतमजूर शेताची कामे करत होती. सामूहिकपणे शेताची कामे करणे, जनावरांचे सामुहिक पालनपोषण करणे, महिलांनी एकत्रीतपणे पिण्याचे पाणी भरणे, कपडे धुणे ही कामे करत होती. परंतु घरवापयी गावात झालेले कॉरन्टाईन आणि काही गावांतील परिस्थिती धोकादायक दिसत असुन काही गावात संदिग्ध रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे गावात संशयास्पद वातावरण, असुरक्षिता निर्माण झाली असून यावर वेळीच नियंत्रण होणे आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी व जबाबदार व्यक्तीने कटाक्षाने जागरूक राहणे आवश्यक आहे. हया बाबत सर्वांनी गंभीरता घेऊन आणि कोणताही बाहेरून आलेला व्यक्तीजवळचा असो किंवा नातेवाईक असो तो कॉरन्टाईन झालाच पाहिजे. त्यांची योग्य प्रकारे तपासणी झालीच पाहिजे ही आपली सुध्दा नैतिक जबाबदारी गावाला वाचविण्याचे काम करावे अन्यथा गावात करोना शिरेल.
 मागील स्वातंत्र्याच्या एका दशकापर्यंत चोरी करणार्‍या टोळ्यांचे प्रमाण जास्त होते. दुष्काळ आणि गरीबी होती. हया लुटारुंच्या टोळ्या गावावर आक्रमण करून संपत्ती लुटायची. ह्या लुटारू टोळीला पिटाळून लावण्यासाठी गावातील लोक आळीपाळीने रात्रीला दिवाबत्ती घेऊन गावाचे रक्षण करीत. लुटारू टोळीची चाहूल लागताच चोर आले धावा रे, चोर आले धावा रे.. अशी ओरड करुन पहारेकरी गावाला जागे करीत गावातील लोक काठ्या घेऊन धावत धावत लुटारू टोळीला पिटाळून लावत. आपल्या गावाला वाचवित आता कोरोनाचे संकट हे त्याहीपेक्षा भयंकर संकट आहे. कोरोना विषाणू चोरासारखा कसा हल्ला करेल हे आपल्याला कळणार नाही. त्याकरीता आपण सतर्क असले पाहिजे. करोना विषाणूला नष्ट करण्यासाठी सामुहिक सहकार्य आणि संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकांनी गंभीरतापुर्वक प्रयत्न करावे. अन्यथा कोरोना विषाणू नावाचा भयंकर चोर आपल्या गावात शिरेल.