Ticker

6/recent/ticker-posts

शेतमाल भिजलेल्या शेतकर्‍यांना मिळाला न्याय : बाजार समिती व्यापार्‍यांवर कारवाई करणार काय


शेतमाल भिजलेल्या शेतकर्‍यांना मिळाला न्याय : बाजार समिती व्यापार्‍यांवर कारवाई करणार काय
वाशीम - १३ मे च्या सायंकाळी जिल्हयात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भिजलेला शेतकर्‍यांचा शेतमाल हर्रासी झालेल्या भावामध्ये मोजून घेण्यात आल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सोशल माध्यमांवर व्हायरल केलेल्या खुलाशा पत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला असला तरी नियमांची वारंवार पायमल्ली करणार्‍या व्यापार्‍यांवर बाजार समिती प्रशासन कारवाई करणार काय ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
 याबाबत बाजार समिती प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या खुलासा पत्रकात नमूद केले आहे की, कोरोना महामारीची लागण शेतकर्‍यांना होवू नये याकरीता महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून १०० किंवा १५० शेतकर्‍यांचाच शेतमाल मोजला जातो. वाशीम बाजार समितीमध्ये जवळपास ५ जिल्हयातील शेतकर्‍यांचा शेतमाल विक्रीकरीता येतो. वाशीम बाजार समिती सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून बाजार समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी जिवाची कोणतीही पर्वा न करता शेतकर्‍यांकरीता २४ तास अविरत काम करत आहेत. बुधवार, १३ मे रोजी वाशीम बाजार समितीत सोयाबीन, मुंग, उडीद व गहू या शेतमालाची आवक ही २५ ते २७ हजार इतकी आली होती. तसेच विक्रीकरीता आलेल्या सर्व शेतमालाची हर्रासी ही अवकाळी पाऊस येण्याच्या अगोदर झाली होती. परंतु १३ मे च्या सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचा शेतमाल पावसात  भिजल्याची माहिती सोशल माध्यमात पसरली होती. तसेच प्रसारमाध्यमांनीही ही बाब उचलुन धरली होती. परंतु शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेल्या बाजार समितीच्या आदेशानुसार व बाजार समितीत काम करणारे व्यापारी, अडते, मापारी, हमाल आदींनी शेतकर्‍यांचा शेतमाल हर्रासी झालेल्या भावामध्येच मोजून घेण्यात आला असून शेतकर्‍यांचा शेतमाल भिजला असला तरी शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची बाजार समिती प्रशासन दक्षता घेत असल्याचा खुलासा सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या या खुलाशापत्रामध्ये नमुद करण्यात आला आहे.
 बाजार समितीने दिलेल्या या खुलाशामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी बाजार समितीच्या प्रांगणात शेतकर्‍यांसाठी बांधलेल्या ओट्यावर व्यापार्‍यांचा माल ठेवला जातो व शेतकर्‍यांचा माल खाली ठेवला जात असल्याची माहिती शेतकर्‍यांकडून मिळत आहे. त्यामुुळे एकीकडे शेतकर्‍यांच्या हिताप्रती खंबीर व न्यायपुर्ण भूमिका घेण्याचे बाजार समितीचे स्पष्टीकरण तर दुसरीकडे शेतकर्‍यांचा शेतमाल डावलून शेतकर्‍यांचे नव्हे तर केवळ व्यापार्‍यांच्या मालासाठी बाजार समितीचे ओटे उपलब्ध करुन देण्याच्या भूमिकेमुळे बाजार समितीच्या कारभाराकडे अजुनही शेतकरी वर्गाकडून संदेहाच्या दृष्टीकोनातून पाहील्या जात आहे. शेतमाल भिजल्याच्या पार्श्‍वभूमिवर सर्वत्र टिकेची झोड उठल्यानंतर तत्परतेने शेतकर्‍यांना न्याय देणारे बाजार समिती प्रशासन तितक्याच तत्परतेने व्यापार्‍यांवर कारवाई करण्यास धजावेल काय ? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.