Ticker

6/recent/ticker-posts

एनआरएचएम कंत्राटी कर्मचार्‍यांचे प्रखर आंदोलन : शासकीय समायोजनाची मागणी : आज लाक्षणीक सामूहीक रजा आंदोलन : विनासुरक्षा करोना वार्डात सेवा देणार


एनआरएचएम कंत्राटी कर्मचार्‍यांचे प्रखर आंदोलन : शासकीय समायोजनाची मागणी : आज लाक्षणीक सामूहीक रजा आंदोलन : विनासुरक्षा करोना वार्डात सेवा देणार
वाशीम - शासन सेवेत कायमस्वरुपी समायोजनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एन.आर.एच.एम.) अंतर्गत गेल्या १५ वर्षापासून आरोग्यसेवा देणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांनी २५ मे पासून काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात २६ मे रोजी सर्व कंत्राटी कर्मचारी लाक्षणीक सामूहीक रजा आंदोलन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध करणार असून शासनाने मागण्या पुर्ण न केल्यास आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ५ जुनपासून कोणतीही सुरक्षा न घेता कोरोना वार्डात आरोग्य सेवा देणार आहेत. याबाबतच १८ मे रोजी राष्ट्रीय ग्रामीण अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष महेंद्र साबळे व महिला अध्यक्षा सुनिता चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
 या निवेदनात नमूद केले आहे की, एनआरएचएम अंतर्गत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी हे मागील १५ वर्षापासून कंत्राटी स्वरुपात काम करत असून त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी समायोजनाकरीता आश्वासित करुन तोपर्यत नविन भरती करणार नसल्याचे सांगीतले होते. समायोजनाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिफारस केली होती. आता शासनाने कायमस्वरुपी भरती काढल्याने सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमध्ये सर्वत्र केवळ कंत्राटी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून हे कर्मचारी कोणतीही तक्रार न करता प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु शासन यांना पुन्हा दुजाभाव देत आहे. तरी या कंत्राटी कर्मचार्‍यांचे शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष पदावर बिनशर्त समायोजन करावे अशी मागणी शासनाला करण्यात आली होती. परंतु शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून १८ मे पासून काळ्या फिती लावून काम, २६ मे रोजी लाक्षणीक सामूहीक रजा आंदोलन, २८ मे पासून कोविड रुग्णसेवा वगळता इतर कामे बंद व कामावर आमरण उपोषण, १ ते ५ जूनपर्यत भरती प्रक्रियेवर बहीष्कार, न्यायालयात धाव, आमदार, खासदारांना निवेदन, ५ जूनपासून विनासुरक्षा कोरोना कक्षात काम आणि ११ जूनपासून सर्व कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या या आंदोलनाला राज्य संघटनेसह आरोग्य क्षेत्रातील विविध ६ संघटनांनी पाठींबा व सहभाग दर्शविला आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेवून कंत्राटी कर्मचार्‍यांचे विनाविलंब शासकीय सेवेत समायोजन करावे अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र साबळे, महिला अध्यक्षा सुनिता चव्हाण यांनी केली आहे.