Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस हवालदार संजय घुले यांची बदली तात्काळ रद्द करा : प्राथमिक सुविधा मागणार्‍या पोलीसांच्या बदलीमुळे पोलीसांच्या मनोधैर्यांचे खच्चीकरण : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ना. ठाकरेंना पत्र


पोलीस हवालदार संजय घुले यांची बदली तात्काळ रद्द करा
प्राथमिक सुविधा मागणार्‍या पोलीसांच्या बदलीमुळे पोलीसांच्या मनोधैर्यांचे खच्चीकरण
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ना. ठाकरेंना पत्र
वाशीम - कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालुन कर्तव्य बजावतांना पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर शिक्षा म्हणून त्यांची बदली करणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे असून संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे. त्यामुळे पोलीस हवालदार संजय घुले यांची शिक्षा म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करुन त्यांना त्यांच्या मुळ जागी काम करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ३० मे रोजी पत्र पाठवून केली आहे.
 या पत्रात ना. फडणवीस यांनी नमूद केले आहे की, कोरोनाशी लढताना आपल्या पोलिस दलातील जवान स्वत: चा जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजवित आहेत. कोरोनाशी लढताना आतापर्यंत राज्यातील सुमारे २३०० हून अधिक पोलिस जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे. नागपूर येथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मी मध्यंतरीच्या काळात मुंबई ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते मुंबई असा रस्त्याने प्रवास केला होता. दि . १७ मे रोजी नागपूरहून मुंबईला परतत असताना वाशीम जिल्ह्यातील जऊळका पोलिस स्थानक, किन्हीराजा पोलिस दलातील हवालदार संजय घुले यांची मार्गात भेट झाली होती. मी त्यांची विचारपूस केली असता, सॅनेटायझर किंवा मास्क यापैकी कोणत्याही प्राथमिक सुविधा त्यांना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कुणीतरी या घटनेचा व्हीडियो काढून व्हायरल केला. त्यानंतर २८ मे रोजी राज्याचे गृहमंत्री वाशीम जिल्हयात येऊन गेले असता, त्याचदिवशी पोलिस अधीक्षकांनी त्यांची किन्हीराजा येथून वाशीम जिल्हयातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या धनज येथे बदली केली. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बदलीचे ठिकाण हे सुमारे १४० कि.मी. अंतरावर आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणार्‍या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलिस दलात संतापाची भावना आहे. त्यामुळे संजय घुले यांची शिक्षा म्हणून करण्यात आलेली बदली तत्काळ रद्द करण्यात यावी आणि पोलिसांना प्राथमिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात . मध्यंतरी नागपूर उच्च न्यायालयात एका प्रकरणात नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात नागपूर शहरातील ७००० पोलिसांना ७८० मास्क, ५ पीपीई किट, १४ एन ९ ५ मास्क आणि २१ सॅनेटायझर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले होते. एका शहराची ही अवस्था असताना अशाप्रकारच्या काळात अशा शिक्षा देणार्‍या बदल्या केल्या जाणार असतील, तर ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करावी आणि संजय घुले यांना त्यांच्या मुळ जागी पुन्हा काम करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.