Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाऊन’ काळात वकीलांची उपलब्धी, घरगुती हिंसाचार, भाडेकरुंना मदत आदींसाठी मोफत विधी सहाय्य : वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम


लॉकडाऊन’ काळात वकीलांची उपलब्धी, घरगुती हिंसाचार, भाडेकरुंना मदत आदींसाठी मोफत विधी सहाय्य
वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम
वाशिम, दि. 08 (जिमाका) : लॉकडाऊन काळात आरोपींना वकील उपलब्ध करून देणे, घरगुती हिंसाचार, भाडेकरूंच्या समस्या सोडवून पीडितांना सहाय्य करण्यासाठी वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने 07252-231455 ही हेल्पलाईन सुरु केली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी दिली आहे.
 सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात शहरामधील बेघर व समाजातील तळातील वर्ग यापैकी कोणीही उपाशी राहणार नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या अनुषंगाने शासकीय कार्यालयाशी समन्वय साधण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत सुरु आहे. याविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, कर्मचारी, विधी स्वयंसेवक मोतीराम खडसे, बाबाराव घुगे व शाहीर इंगोले हे स्वतः भेटी देवून माहिती घेत आहेत. नागरिकांनी खाण्यापिण्याची व्यवस्था, निवास व्यवस्थाविषयी तक्रारीची माहिती प्राधिकरणास दिल्यास याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील, असे श्री. देशपांडे यांनी कळविले आहे.
 लॉकडाऊन काळात न्यायालयीन कामकाज हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चालत आहे. केवळ अत्यावश्यक व तातडीची प्रकरणे या काळात चालविण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आल्याचे श्री. देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.