Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य पद भरतीतील इच्छुक उमेदवारांची आर्थिक फसवणूक : नियुक्तीच्या भुलथापा देवून पैशाची मागणी : भिमसंग्राम संघटनेची कारवाईची मागणी


आरोग्य पद भरतीतील इच्छुक उमेदवारांची आर्थिक फसवणूक
नियुक्तीच्या भुलथापा देवून पैशाची मागणी : भिमसंग्राम संघटनेची कारवाईची मागणी
वाशीम - कोविड आजाराच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या पदभरतीमध्ये अर्ज भरणार्‍या महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसह कंत्राटी कर्मचार्‍यांना अज्ञात व्यक्तींकडून भ्रमणध्वनीव्दारे विविध कारणे सांगुन त्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याची प्रकरणे घडत आहेत. या ‘सायबर क्राईम’ प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत अज्ञात व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भिमसंग्राम सामाजीक संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी २६ मे रोजी महाराष्ट्र सायबर विभागाला ई-मेल व्दारे निवेदन पाठवून केली आहे.
    निवेदनात नमूद केले आहे की, कोविड आजाराच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागात पदांची भरती सुरु केली असून यासाठी इच्छुक पात्रताधारक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तींकडून अशा उमेदवारांची फसवणूक सुरु झाली आहे.
    आमच्या संघटनेकडे आलेल्या एका तक्रारीनुसार आरोग्य विभागात नोकरीसाठी अर्ज भरलेल्या एका महिला उमेदवाराच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तींकडून ७५५०९७७८३४ या मोबाईल क्रमांकावर फोन आला. व त्याने संबंधीत उमेदवाराला म्हटले की, मी डाटा एन्ट्री ऑपरेटर असून अकोला जिल्हयातून बोलत आहे. आपण आरोग्य विभागात नोकरीसाठी अर्ज केला असून या नोकरीसाठी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी आपणास ५० हजार रुपये भरावे लागणार असून त्यानंतर आपणास एका आठवड्यामध्ये थेट नोकरीमध्ये परमनंट नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. असे बोलणे त्या अज्ञात इसमाने केले. परंतु त्या महिलेने पैसे देण्यास साफ नकार दिला आहे. मोबाईलवर ट्रु कॉलर अ‍ॅपमध्ये सदरील अज्ञात व्यक्तीचे नाव हिमांशु मिश्रा असे दिसत असून पत्ता वेस्ट बंगाल (इंडिया) असा दिसत आहे. सदरील व्यक्तींकडून महाराष्ट्रातील इतरही अनेक इच्छुक उमेदवारांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसून यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदरील व्यक्तीचा शोध घ्यावा व त्याच्यावर सायबर क्राईमच्या कलमानुसार कठोरात कठोर कारवाई करावी. जेणेकरुन इतर उमेदवारांची फसवणूक होणार नाही. अशी मागणी डॉ. हिवाळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.