Ticker

6/recent/ticker-posts

कोणत्याही अर्ज व कागदपत्राविना नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार अर्थसहाय्य मिळणार


कोणत्याही अर्ज व कागदपत्राविना नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार अर्थसहाय्य मिळणार
मुंबईवरुन डीबीटी पध्दतीने बँक खात्यात वितरणास सुरुवात
मुंबई, दि. २३ : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (डीबीटी पध्दतीने)  वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडुन कळविण्यात आले आहे.
 सदरचे अर्थसहाय्य मिळवून देण्याकरीता कोणत्याही संघटना, संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडून कामगारांना भूलथापा मारून कागदपत्रांची मागणी होत असल्यास त्यांनी कामगार विभागाकडे किंवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. कामगारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
 जिल्हा कार्यालयस्तरावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयातून राज्यातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना थेट (डीबीटी ) पध्दतीने  रकमेचे वाटप करण्यात येत आहे. जिल्हा कार्यालयाकडून सर्व नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांची यादी व बँकेचा तपशील मंडळस्तरावर मागवून अर्थसहाय्य वाटप करण्यात येत असून त्यास मंडळाच्या मुख्यालय स्तरावरून दि. २० एप्रिल २०२० पासून सुरुवात झाली आहे.
 अशी माहिती इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चु.श्रीरंगम्  यांनी दिली.