Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग कल्याण निधी : अर्ज भरण्यासाठी जि.प. कडून १२ मे पर्यत मुदतवाढ : दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग बचत गटांना दिलासा : दिव्यांग संघटनांच्या मागणीला यश : (बातमीसोबत विहीत अर्जाचा नमुना व कागदपत्रांची यादी)


दिव्यांग कल्याण निधी : अर्ज भरण्यासाठी जि.प. कडून १२ मे पर्यत मुदतवाढ : दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग बचत गटांना दिलासा : दिव्यांग संघटनांच्या मागणीला यश : (बातमीसोबत विहीत अर्जाचा नमुना व कागदपत्रांची यादी)
वाशीम - कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमिवर दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी दिव्यांग कल्याण निधीत शिल्लक असलेला रु. १९ लाख २० हजार रुपयाचा निधी जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग बचत गटाकरीता वितरीत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २२ एप्रिल रोजी काढले होतेे. यासाठी पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन संबंधीतांना करण्यात आले होते. यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत ३० एप्रिलपर्यत ठेवण्यात आली होती. तसेच यासंदर्भातील वृत्त २५ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आले होते. मात्र सदरील वृत्त प्रसारीत झाल्यानंतर केवळ पाच दिवसाची मुदत दिव्यांगांना अर्ज सादर करण्यासाठी पुरेशी नसल्याचे कारण देवून अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मनिष डांगे व रुद्र अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष बालाप्रसाद अग्रवाल यांनी जि.प. प्रशासनाकडे केली होती. या मागणीवर विचार करुन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत १२ मे २०२० पर्यत वाढ केली आहे. यासंदर्भातील सुधारीत पत्र जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी २७ एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना जारी केले आहे. यासोबतच १२ मे पर्यत प्राप्त होणार्‍या सर्व अर्जाची छाननी करुन १५ मे पर्यत सर्व माहिती विहीत प्रपत्रामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करण्याचे आदेशही गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. 
 या आदेशामध्ये, वैयक्तीक लाभाच्या योजनामध्ये दिव्यांग व्यक्तीकडून विहीत नमुन्यात अर्ज भरुन घेण्यासह अपंगत्वाच्या उतरत्या क्रमाने लाभार्थींची निवड करण्याचे आदेशीत करण्यात आले असून सामुहिक लाभाच्या योजनेमध्ये दिव्यांग बचत गटाच्या अपंग सदस्यांच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने निवड करण्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 तथापी, लॉकडाऊनच्या परिस्थितीत दिव्यांग व्यक्ती घराबाहेर पडू शकत नसल्याची बाब लक्षात घेवून लाभार्थ्यांकडून विहीत नमुन्यात अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी ग्रामसचिव व पंचायतचे विस्तार अधिकार्‍यांवर टाकण्यात आली आहे. तसेच यापुर्वी लाभ न घेतल्याबाबतच्या प्रतिज्ञापत्रासह यापुर्वी असा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारु नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थीच्या संपुर्ण माहितीची शहानिशा व निवडीचे अधिकार गटविकास अधिकारी व संबंधीत विस्तार अधिकारी (पंचायत) यांना देण्यात आले आहेत. 
(बातमीसोबत विहीत अर्जाचा नमुना व कागदपत्रांची यादी)