Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाऊन काळात नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी एकत्र येण्यास मनाई


लॉकडाऊन काळात नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी एकत्र येण्यास मनाई
वाशिम, दि. २१ (जिमाका) : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. या महिन्यात मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने सार्वजनिकरित्या नमाज अदा करतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू असून जिल्ह्यातही संचारबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे या कालावधीत मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २१ एप्रिल रोजी निर्गमित केले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यातही कटाक्षाने करावे. कोणत्याही परिस्थितीत मस्जिदमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या अथवा इमारतीच्या छतावर एकत्र येवून नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येवू नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येवू नये. तसेच कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्र येवून करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत. लॉकडाऊनविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
या आदेशांचे पालन करण्यासाठी मुस्लीम धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, आदेशात नमूद करण्यात आले आहे.