Ticker

6/recent/ticker-posts

बेरोजगार युवकांसाठी ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर आधार लिंक सुविधा उपलब्ध : शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यावश्यक


बेरोजगार युवकांसाठी ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर आधार लिंक सुविधा उपलब्ध
शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यावश्यक
वाशिम, दि. २९ (जिमाका) : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता आहे. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुनंदा बजाज यांनी दिली आहे.
 नोकरीसाठी सेवायोजना म्हणजेच आताच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजीत करण्यात  येणार्‍या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणार्‍या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे. आपली शैक्षणीक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल यामध्ये दुरूस्ती करणे वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
 उद्योजकाच्या मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधारलिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीसह आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. तरी सर्व बेरोजगार युवक, युवतींनी तत्काळ ऑनलाईन पद्धतीने आपल्या नोंदणीला आधार कार्ड लिंक करावे.
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट’ या टॅबमध्ये जॉब सिकर’ (फाईंड अ जॉब)मध्ये जॉब सिकर लॉगीनमध्ये जाऊन लॉगीनवर क्लिक करावे. त्यामध्ये अपडेट आधार कार्ड अँड ऑदर डीटेल्सवर क्लिक केल्यानंतर अपडेट बटनवर क्लिक करावे. ऑनलाईन पद्धतीने आधार लिंक करण्यास काही अडचणी येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.