Ticker

6/recent/ticker-posts

बॅन्ड कलावंत, गायक कलावंतांची उपासमार : दरमहा पाच हजार आर्थिक मदत देण्याची अ.भा. मातंग संघाची मागणी


बॅन्ड कलावंत, गायक कलावंतांची उपासमार
दरमहा पाच हजार आर्थिक मदत देण्याची अ.भा. मातंग संघाची मागणी
वाशीम - बँन्ड व गायक कलावतांचे वर्षभराचे खर्चाचे नियोजन फेब्रुवारी ते जुलै महिन्यातील लग्नसमारंभावरच असते. मात्र करोना आजारामुळे देशात लॉकडाऊन घोषत झाल्यामुळे इतर व्यवसायाबरोबरच बँन्ड कलावंत व गायक कलावतांच्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या व्यवसायाशी निगडीत बँन्ड कलावंत व गायक कलावंतांची उपासमार होत आहे. शासनाने या बाबीचा सहानुभुतीने विचार करुन या कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारतीय मातंग संघाने केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे यांनी 23 एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून केली.
    निवेदनात नमूद आहे की, सध्या देशासह महाराष्ट्रासह करोना विषाणुच्या प्रदुर्भावामुळे 24 मार्चपासून 3 मे पर्यत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तसेच कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही तर हे लॉकडाऊन पुढे वाढुही शकते. अशातच बँड कलावंत आणि गायक कलावंत यांचे फेब्रुवारी ते जुलै हया पाच ते सहा महिन्यात लग्न समारंभ, प्रबोधन , गायनाचे अनेक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमाच्या भरवशावरच या कलावंतांच्या कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. परंतु ऐन लग्नसराईच्या कालावधीतच संपुर्ण भारत देश लॉकडाऊन झाल्यामुळे या बॅन्ड कलावंतांच्या परिवाराावर उपासमारीची पाळी आली आहे. आपल्या व्यवसायात या कलावंतांनी लाखो रूपये गुुंतवुन गायन मंडळ , बँड पथक, ऑर्केस्टा, प्रबोधन मंडळे निर्माण केलेली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारे लग्न समारंभ वा इतर सर्व समारंभ ठप्प पडल्यामुळे बॅन्ड कलावंत व गायक कलावंतांना काम मिळेनासे झाले असून यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने या बाबीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन अशा बॅन्ड व गायक कलावंतांना करोना प्रादुर्भाव कालावधीत किमान 5 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अ.भा. मातंग संघाचे विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे युवा जिल्हाध्यक्ष आर. के. पाटोळे, वाशीम शहर सचिव गोविंद डोंगरे आदींनी निवेदन देवून केली आहे.