Ticker

6/recent/ticker-posts

‘मटा’ वर वाशीम जिल्हयाचा गजर : दिल्लीवरुन खुशखबर : अधिकार्‍यांच्या कार्याची कदर


‘मटा’ वर वाशीम जिल्हयाचा गजर : दिल्लीवरुन खुशखबर : अधिकार्‍यांच्या कार्याची कदर
वाशीम - लॉकडाऊन कालावधीत एकीकडे मुंबई पुण्यातील करोना रुग्णसंख्येचा आलेख वाढता असतांना वाशीम जिल्हयातील प्रशासन, पोलीस, आरोग्य या घटकांच्या एकत्रित परिश्रमामुळे गेल्या 14 दिवसापासून जिल्हयात एका पॉझीटीव्ह रुग्णाव्यतीरिक्त एकही नविन रुग्ण आढळून आला नाही. या संदर्भातील वाशीम जिल्हयाची चांगली बातमी ‘मटा’ या अग्रगण्य वृत्तवाहीनीने थेट दिल्लीवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीसह दिली असून वाशीमसह लातूर, उस्मानाबाद व हिंगोलीचाही उल्लेख या बातमीत आहे. 
 वाशीम जिल्हयात करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांच्यासह जिल्हा पोलीस दल, महसुल विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, नर्स, अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षक, गटविकास अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील आदी प्राणपणाने झटत आहेत. यासोबतच प्रसारमाध्यमातील सर्व घटकही प्रशासनाच्या सकारात्मक बाबी व नागरीकांनी कटाक्षाने पाळावयाच्या सुचना येनकेनप्रकारे नागरीकांपर्यत पोहचवून करोनाविषयी उत्तम प्रकारे बचावात्मक जनजागृती करत आहेत. या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे जिल्हयात गेल्या 14 दिवसापासून बाहेरुन आलेल्या एका पॉझीटीव्ह करोना रुग्णाव्यतीरिक्त नव्या रुग्णाची वाढ झाली नाही. ही बाब निश्‍चितच वाशीम जिल्हावासीयांना दिलासा देणारी असून प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणारे जिल्हावासी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांचे चांगले फळ आहे. 
 वाशीम जिल्ह्यासंदर्भात ‘मटा’ मध्ये दिलेल्या बातमीत वाशीम जिल्हयात एकही नविन करोना रुग्ण आढळून आला नसून जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात असून लॉकडाऊनच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केले जात असून वाशीम जिल्हयाने याबाबतीत चांगली कामगिरी केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. वाशीमसह लातुर, उस्मानाबाद, हिंगोली आणि देशातील राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातल्या जवळपास 61 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
 दरम्यान, करोना रुग्णांच्या उपचारांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच एचआयव्ही आणि कॅन्सर सारख्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे दिशानिर्देश दिले गेले आहेत. दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या 18985 पर्यंत पोहोचली आहे. सध्या 15,122 जणांवर उपचार सुरू आहे. उर्वरीत 3260 पैकी काही जण बरे झाले आहेत. काही विदेशी नागरिक होते. तर 603 जणांना करोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.