रविवार, २६ एप्रिल २०२० : जयंती विशेष
महात्मा बसवण्णा : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष
लेखक : चन्नवीर भद्रेश्वरमठ
(लेखक शरण साहित्याचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत.)
महात्मा बसवेश्वर म्हणजे बसवण्णांनी सर्व प्रकारची सुतकं फेटाळून लावली होती. त्यात रजस्व सुतक म्हणजे मासिक पाळीचा विटाळही होताच. ती खरी स्त्रीपुरूष समानता होती. ते नऊशे वर्षांपूर्वी करू शकले, ते आपण आजही करू शकत नाही. मासिक पाळीचा विटाळ पाळणं हे बसवविचारांच्या विरोधात आहे, हेदेखील मान्य करू शकत नाही. त्यांच्या जयंती निमित्त विशेष लेख.
भारतीय मूळ असणार्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स अंतराळ मोहिमेवरून परतल्या, तेव्हा त्या प्रत्यक्ष अंतराळात सर्वाधिक काळ घालवलेल्या महिला होत्या. त्यांनी इतिहास घडवला होता. वर्षानुवर्षं बाईपणाच्या म्हणून लादलेल्या बंधनांना त्यांनी कर्तृत्वाने झुगारलं होतं.
त्या पृथ्वीवर परतल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं, या मोहिमेत बाई म्हणून तुला काही अडचणी आल्या नाहीत का? त्या म्हणाल्या, यंत्र केवळ कमांड स्वीकारतात. तुमच्या आदेशाचं पालन करतात़. कम्प्युटर कमांड देणारे हात कुणाचे आहेत, बाईचे किंवा पुरूषाचे हा भेद करत नाही़. कोणीही क्लिक केल्यावर ही यंत्रं त्याचं काम करतातच.
सुनिता विल्यम्स यांनी दिलेलं उत्तर थेट वेगळ्या संदर्भात पण अक्कमहादेवींशी नातं सांगणारं आहे. ९०० वर्षांपूर्वी क्रांतिकारी विचार मांडणार्या अक्कमहादेवी म्हणाल्या होत्या, बाई किंवा पुरूष केवळ शरीरावरूनच ठरतं. पण आत्म्याला लिंगभेद नाही़. अक्कमहादेवींची जवळपास ५०० वचनं म्हणजे कविता उपलब्ध आहेत़. केवळ मोकळे केस हेच कपडे मानून वावरणार्या महादेवीने स्त्री- पुरूष समानतेचा पुरस्कार केलाय.
स्त्रीपुरुष समानतेची क्रांती
अशा अक्कमहादेवी एकट्या नाहीत. महात्मा बसवेश्वर म्हणजेच बसवण्णा यांनी उभं केलेल्या लिंगायत क्रांतीचं नेतृत्व अशा शेकडो महिला करत होत्या. तेही बाराव्या शतकात म्हणजे आजपासून नऊशे वर्षांपूर्वी. आज आपल्याकडे अशा ३४ महिला शरणांची वचनं उपलब्ध आहेत. बसवण्णांनी केलेल्या या क्रांतीत एक मुख्य आधार स्त्रीपुरूष समानतेचा होता. त्यातून त्यांनी सर्व प्रकारचा विटाळ झिडकारून लावला.
बसवण्णांच्या नेतृत्वात घडलेल्या शरणांच्या क्रांतीमधे धर्मासह सर्वच क्षेत्रांत स्त्रीपुरुष समान मानलेत. स्त्री ही केवळ दासी नसून ती सहचारिणी आहे. ती माया नसून महादेवी आहे. स्त्री शूद्र नाही, तर साक्षात महादेवी आहे. असा स्त्री समानता वादी दृष्टीकोन अनुभव मंटपाने स्वीकारला होता. स्त्रियांना अनिष्ट प्रथा परंपरेच्या जोखडातून मुक्त करून अनुभव मंटपाने त्यांच्या विचार शक्तीला प्रेरित केलं.
अनुभव मंटपाने समानता प्रत्यक्षात
अनुभव मंटप ही देशातली पहिली लोकसंसद होती. महात्मा बसवण्णांच्या या अनुभव मंटपात अनुभाव मिळवलेल्या व्यक्तींना स्थान होतं. अनुभव आणि अनुभाव यात फरक आहे. अनुभाव म्हणजे जीवनानुभवामुळे आणि स्वत:ला ओळखल्यामुळे मिळणारी अंतरंग बहिरंग शुद्धीची शक्ती होय. अशाच अनुभाव शक्तीचा आविष्कार असणारे बसवादी शरण अनुभव मंटपात अनुभाव चर्चा करत. अनुभावाच्या पातळीवर सर्वांना समान मानलं गेल्याने मानवी मूल्यांची प्रस्थापना आपसूकच झाली.
अनुभव मंटपात सहभागी होणार्या सर्व जाती धर्माच्या ७७० सदस्यांपैकी महिलांची संख्या ७० होती. महिलांना अनुभव मंटपाच्या चर्चेत सहभाग घेण्याचा, प्रश्नोत्तरं करण्याचा अधिकार होता. अक्कमहादेवी, दुग्गळे, धान्य गोळाकरणारी लक्कम्मा, सत्यक्का, मुक्तायक्का, अक्कनागम्मा, निलांबिका, गंगांबिका, कल्याणम्मा, रायम्मा, संकव्वा, महादेवी, सोमव्वा अशा अनेक शरणी आपला नित्याचा कायक म्हणजे कामं करून अनुभव मंटपात चर्चेसाठी सहभागी होत. सूळी संकव्वा या शरीरविक्रय करणारी भगिनीही त्यात होती.
विचारांचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचंही
तेव्हा प्रस्थापित असणार्या वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत बाईला शूद्रच ठरवून दुय्यम स्थान दिलं होतं. मनूसारख्यांनी तिला माणूस म्हणूनही जगण्याचे हक्कही नाकारले होते. ती केवळ उपभोग्य वस्तू बनली होती. मात्र शरण संस्कृतीत बाईला दुय्यम नाही, तर समान स्थान होतं. बाराव्या शतकातल्या बसवांसह सर्व शरणांच्या वचन साहित्यात स्त्रीचा गौरव पदोपदी दिसून येतो़.
फक्त साहित्यात नाही, तर प्रत्यक्षातही महिला पुरुषांच्या बरोबरीने वावरताना दिसतात़. त्यांना विचार स्वातंत्र्य होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. त्यांच्या विचारांना, भूमिकांना महत्त्व होतं. इतकंच नाही, तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आपल्या पतीला जाब विचारण्याची धमक त्यांच्यात होती़. आय्यदक्की मारय्याला त्याची पत्नी लक्कम्माने जाब विचारल्याची वचनं आहेत़. पण पती पत्नींच्या एकरूप सहजीवनाचा प्रत्यय शरण साहित्य वाचताना येतो. अनेक स्त्री शरणांनी आपल्या नावात पतीचंही नाव गुंफलेलं आहे. शरण संस्कृतीने म्हणजेच बसव युगाने स्त्रियांना सर्वच पातळ्यांवर समान स्थान दिलं होतं.
विटाळ बसवविचारांच्या विरोधी
समाजातील विषमतेचं उच्चाटन झालं पाहिजे, असं म्हणणारा खर्या अर्थाने पुरोगामी विचार बसवण्णांनी व्यापक स्वरूपात मांडला. स्त्री आणि पुरुषात केला जाणारा दुजाभाव त्यांनी नाकारला. स्त्री ही अपवित्र आहे अशी बतावणी करणार्या परंपारावादी, प्रतिगामी आणि पाखंडी धर्मांचा त्यांनी समाचार घेतला. जन्म जाती, रजस्व, उच्छिष्ट आणि मृत्यू ही पंचसुतकं अनुभव मंटपाने निषिद्ध ठरवली.
आई देव आहेच यात वाद असायचं कारण नाही़. पण स्त्री म्हणून बायको, बहीण, मुलगी, काकी, मामी यासह इतर सगळ्या नात्यांमधील स्त्रीसुद्धा देवच आहे. एकट्या आईला देवत्व देताना इतर स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यावर महात्मा बसवण्णा यांनी हल्ला चढवलाय. स्त्री गौरव हा शरण संप्रदायाचा मानबिंदू आहे. त्यामुळे बाईला धर्माच्या नावाने जोखडात अडकवणार्या मासिक पाळीच्या पावित्र्याच्या कल्पनेला बसवण्णांनी तेव्हाच सुरुंग लावला होता.
मासिक पाळीचा विचार करताना बसवादी शरण काळाच्या कितीपुढे होते याची जाणीव होते. बसवण्णांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.
शरणांच्या साहित्यातली बंडखोरी
विटाळाबद्दल अक्कमहादेवी म्हणतात,
स्त्री स्त्री झाल्यास तिला पुरूषाचा विटाळ
पुरूष पुरूष झाल्यास त्याला स्त्रीचा विटाळ
मनातला विटाळ नष्ट झाल्यास
शरीराच्या विटाळाला काही अर्थ आहे का?
हे देवा, अस्तित्वातच नसलेल्या विटाळाला जग भुललंय पहा
माझे गुरू चन्नमल्लिकार्जुन देवांसाठी सारं जगच स्त्री पहा़
ज्येष्ठ वचनकार विणकर दासिमय्या म्हणतात, छाती पुढे आल्यास आणि मासिक पाळी आल्यावर त्या शरीराला स्त्री म्हणतात. दाढी मिशा वाढल्यावर त्या शरीराला पुरूष म्हणतात. त्या दोन्ही शरीरातला आत्मा एकच आहे. आत्मा स्त्री नाही वा पुरूष नाही़. दासिमय्यांनी इथे मुडी’ हा शब्द वापरलाय. मुडी - मुडचट्टा या कन्नड शब्दाचा विटाळ असा आहे. मातंग धूळय्या शरण या विटाळाविषयी म्हणतात,
मनाचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं
शरीराचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं
लिंगाचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं
गर्भाचं किटाळ आत्मप्रज्ञाने घालवावं
किटाळ नष्ट झाल्यावर कामधूम धूळेश्वर लिंग
कुणाला काही म्हणणार नाही
हेण्णू (बाई), होन्नू (सोनं), मण्णू (जमीन) या तीन माया असून, त्यांच्यापासून लांब राहण्याची पक्की समाजधारणा होती. त्यामुळे स्त्री म्हणजे माया म्हणजे मोहात ओढणारी आणि विनाशाला कारणीभूत ठरणारी ठरवली असताना शिवयोगी सिद्धरामांनी याचं खंडन केलं.
स्त्री ही माया नसून, ती साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन असल्याचं सिद्धरामांनी सांगितलं. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन हे सिद्धरामांचं आराध्य दैवत. म्हणूनच सिद्धरामांनी म्हणजेच सिद्धेश्वरांनी स्त्रीला आपलं आराध्य दैवत म्हटलंय. सिद्धरामांनी गंगा, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी या देवतांचा संदर्भ दिलेलं एक वचन असंय,
देवा तुम्ही निर्मिलेली स्त्री तुमच्या डोक्यावर बसली.
देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री तुमच्या मांडीवर बसली.
देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री ब्रह्माच्या जिभेवर बसली.
देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री तुमच्या डोक्यावर बसली.
देवा, तुम्ही निर्मिलेली स्त्री नारायणाच्या छातीवर बसली.
म्हणूनच स्त्री ही केवळ स्त्री नाही, स्त्री ही सुवर्ण वा संपत्ती नव्हे,
स्त्री ही माया नव्हे, स्त्री ही राक्षसी नव्हे
तर ती साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय.
म्हणून बसवण्णा फार मोठे
तर आणखी एक शरण चन्नबसवण्णा म्हणतात, ज्या डोळ्यांनी ईश्वराला पाहतो, त्याच डोक्यांनी पर स्त्रीकडे पाहिल्यास ईश्वर कसा दिसेल? वासना आपल्या मनात आलीच तर तिथे देवत्वाचा र्हास होतो़. तर सोड्डळ चामरस हा शरण विचारतो, स्तनांचं अमृतपान करूनच मोठ्या झालेल्या मना, तेच पाहून कसा रे तडफडतोस? बसवण्णांचा सहकारी असलेला हडपद अप्पण्णा हा शरण म्हणतो स्थावर मालमत्ता, संपत्ती आणि स्त्री यांच्याविषयी लालसा न ठेवणार्यालाच मी ईश्वर म्हणूनच पाहीन.
बसवण्णांसह शरणांनी बालविवाहाला विरोध केला. पुनर्विवाहाला संमती दिली होती़. शिवाय लग्नाच्या निर्ययात पुरूषाइतरकाच स्त्रियांनाही निर्णय घेण्याचा, पसंती नापसंती दाखवण्याचा अधिकार दिला होता़. मातंग जातीतल्या हरळय्या आणि ब्राह्मण जातीतल्या मधुवय्या यांच्या मुलामुलींच्या अनुभव मंटपात घडवून आणलेल्या लग्नाचा एकूणच पैस आपण समजून घेतला, तर लक्षात येतं की बसवयुगाने मुलीला मनाप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलाय.
जवळपास नऊशे वर्षांपूर्वी महात्मा बसवण्णा, त्यांच्या हजारो सहकार्यांनी आणि लिंगायत धर्म मानणार्या समाजाने उभी केलेली स्त्री पुरुष समानता आजच्या आधुनिक युगातही मान्य होत नाही. साधा मासिक पाळीचा विटाळही आपण झुगारू शकत नाही. बसवण्णा म्हणूनच मोठे आहेत. फार मोठे आहेत.