Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यानी लॉकडाऊनच्या संधीचे अभ्यासातुन सोने करावे - मोटीवेशनल ट्रेनर प्रा. अंकुश शिंदे


विद्यार्थ्यानी लॉकडाऊनच्या संधीचे अभ्यासातुन सोने करावे - मोटीवेशनल ट्रेनर प्रा. अंकुश शिंदे
वाशीम - कोरोना महामारीपासून वाचविण्यासाठी झालेले लॉकडाऊन म्हणजे विद्यार्थ्यासाठी सक्तीची विश्रांती नाही. विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊनला सोनेरी संधी समजून या संधीचे अभ्यासातून सोने करावे असे आवाहन प्रसिध्द मोटीवेशनल ट्रेनर, महाराष्ट्र भुषण पुरस्कारप्राप्त तथा विद्यार्थी विकास संघ, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंकुश शिंदे यांनी केले आहे.
 विद्यार्थ्यांना आवाहन करतांना ते पुढे म्हणतात की, सध्या जगातील अनेक प्रगत देश कोरोना या महामारीपुढे हतबल होत आहेत. भारत देशातही कोरोनाच्या थैमानामुळे सर्वच क्षेत्रातील उद्योगधंदे ठप्प पडण्यासह शिक्षण क्षेत्रावर दुरगामी परिणाम झालेला आहे. दहावी-बारावी बोर्डच्या परीक्षा संपत असतांना देशात लॉकडाऊन करण्यात आले. मेडिकल इंजिनिअरिंगसह अनेक स्पर्धा परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. अशातच २०२० मध्ये होणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. परीक्षा रद्द होणार का? वर्ष वाया जाणार का? अभ्यासक्रमात किंवा परीक्षेमध्ये बदल होणार का? असे अनेक प्रश्नांचे तरंग विद्यार्थ्यांच्या मनात उठत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्येही बदल होत आहे. त्यांना अभ्यास करण्याची मुळीच इच्छा होत नाही. काही विद्यार्थी सोशल मीडिया (जसे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम व गेम) मध्ये मग्न आहेत. काही विद्यार्थ्यांना असेही वाटते की, थोड्या दिवसात लॉकडाऊन संपेल व सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल. परंतु कोरोनाबाधीतांची व मृत्यूची वाढती संख्या पाहता परिस्थिती लवकर सुधारेल असे वाटत नाही. कोरोना व्हायरस सोशल डिस्टन्सीग (सामाजीक अंतर) न पाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो हे प्रमुख कारण लक्षात घेता क्लासेस, शाळा तसेच महाविद्यालय लवकर सुरू होतील या भ्रमात विद्यार्थ्यांनी राहू नये. या माहामारीमुळे लॉकडाऊनच्या रुपात मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीला विद्यार्थ्यांनी आपल्यावर आलेले संकट न समजता ही सुवर्णसंधी समजून त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. या काळात सोशल मिडीयावर तासनतास टाईमपास न करता आपला उर्वरित अभ्यास पुर्ण करावा. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून (युट्युब) विविध विषयाच्या प्राध्यापकांचे, तज्ञांचे ऑडिओ, व्हिडिओ लेक्चर लेक्चर ऐकावे, बघावे. जेणेकरून आपल्याला असलेल्या अडचणी दूर होतील. 
 विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपसात चर्चा करून काही प्रश्न सोडवावे किंवा संबंधित विषयाच्या प्राध्यापकांकडून आपल्या शंकेचे निरासन करावे. या लॉकडाऊनमुळे जसे विद्यार्थी फ्री आहेत तसेच शिक्षक सुद्धा फ्री च आहेत. ते नक्कीच आपल्याला मदत करतील. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामांकित संस्थेच्या टेस्ट ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. सोशल मीडियाचा वापर करून आपण त्या सोडवू शकतो. आपल्याजवळ असलेल्या स्टडी मटेरियल मधून सुद्धा आपण अधिकाधिक रिविजन करू शकतो. नामांकित लेखकांची पुस्तके, वेगवेगळ्या प्रकारचे पीडीएफ अ‍ॅप्स देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्याचा सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. त्याचबरोबर सर्व पालकांनी सुद्धा आपला पाल्य भरकटणार नाही याची काळजी घ्यावी व त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून घरातच किंवा गच्चीवर थोडा व्यायाम करावा. योग्य तो (संतुलित) आहार घ्यावा. वाचनाकडे लक्ष द्यावे, जेणेकरून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. लॉकडाऊनच्या या काळात विद्यार्थ्यांनी निराश न होता अशा प्रकारचे आशावादी मार्ग शोधले पाहिजेत. एक ध्येयवादी, जिद्दी व होतकरू विद्यार्थी या संकटावर नक्कीच मात करतो किंवा उपाय शोधत असतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहीजे असा सल्ला प्रा. अंकुश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.