Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हयात खरीप व रब्बी हंगामात कृषि क्षेत्रासाठी १६५० कोटीं कर्जवाटपाचे उद्दीष्ट : सोयाबीन पिकासाठी प्रतिहेक्टरी ४५ हजार रुपये कर्ज मर्यादा निश्चित 


जिल्हयात खरीप व रब्बी हंगामात कृषि क्षेत्रासाठी १६५० कोटीं कर्जवाटपाचे उद्दीष्ट : सोयाबीन पिकासाठी प्रतिहेक्टरी ४५ हजार रुपये कर्ज मर्यादा निश्चित 
शेतकर्‍यांकडून आनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पिक कर्ज वाटपाची कार्यवाही करा - जिल्हाधिकारी
वाशीम - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात २१ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या २१०० कोटी रुपयांच्या वार्षिक कर्ज वितरण आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या आराखड्यानुसार आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तसेच रब्बी हंगामात ५० कोटी रुपये पिक कर्ज वितरीत केले जाणार आहे. तर सोयाबीन पिकासाठी यंदा प्रतिहेक्टर ४५ हजार रुपये कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
 बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, प्रभारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 जिल्हा अग्रणी बँकेने तयार केलेल्या वार्षिक कर्ज वितरण आराखड्यामध्ये खरीप हंगामात पिक कर्ज वितरणासाठी १६०० कोटी रुपये, रब्बी हंगामात पिक कर्ज वितरणासाठी ५० कोटी रुपये व कृषि मुदत कर्जासाठी १५० कोटी रुपये उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अशाप्रकारे कृषि क्षेत्रासाठी १८०० कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) करिता ९५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे, तर शिक्षण कर्ज १० रुपये, गृह कर्जासाठी १२० कोटी रुपये, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी ५५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच प्रधान्येतर क्षेत्रांसाठी २० कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
प्रत्येक पात्र शेतकर्‍याला पिक कर्ज मिळावे - जिल्हाधिकारी
 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने जिल्ह्यात पिक कर्जासाठी पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या यावर्षी वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकर्‍याला पिक कर्ज बँकांनी उपलब्ध करून द्यावे. सोयाबीन पिकासाठी यंदा प्रतिहेक्टर ४५ हजार रुपये कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली असून पात्र शेतकर्‍याला यापेक्षा कमी पिक कर्ज वितरण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व बँकांना दिल्या. तसेच शेतकर्‍यांकडून आनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पिक कर्ज वाटपाची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.