Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी करा


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराची चौकशी करा


जिल्हयातील स्वयंसेवी संस्थेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


वाशीम - राज्याच्या युवा धोरणानुसार युवक कल्याणच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सन २०१७ पासून स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले नाही. तसेच सन २०१७ पासून जिल्हा युवा तसेच राज्य युवा पुरस्कारासाठी युवक, युवती व विविध संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करुन स्वयंसेवी संस्थांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हयातील स्वयंसेवी तथा बहूउद्देशिय संस्थांच्या वतीने १६ मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.


                दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, वाशीम जिल्हयातील स्वयंसेवी संस्था ह्या विविध स्वयंरोजगार, प्रशिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या संपुर्ण जिल्हयात युवक कल्याणच्या योजना दरवर्षी राबविल्या जात आहेत. परंतु सदर योजना वाशीम जिल्हयात सन २०१७ पासून बंद आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून जिल्हयातील स्वयंसेवी संस्थांकडून यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले नाहीत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणतात की, आमच्या कार्यालायकडे या योजनेचा कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे वरील योजनेकरीता प्रस्ताव मागविण्यात आलेले नाहीत. तसेच राज्याचे युवा धोरण सन २०१२ नुसार सदर योजनेकरीता सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्हा व ग्रामीण स्तरावर विविध प्रकारचे प्रशिक्षण राबविण्यासाठी शासनाकडून राज्यासाठी रु. ३५ लक्ष इतका निधी उपलब्ध झालेला होता. परंतु युवक, युवती व संस्थेचे प्रस्ताव त्यांनी आतापर्यत मागविण्याची कार्यवाही केलेली नाही.


                तसेच दरवर्षीप्रमाणे युवक, युवती व विविध संस्थांना देण्यात येणारे जिल्हा युवा पुरस्कार, राज्य पातळीवर राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०१७ पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने मागविले नाही. तरी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात या योजनांसाठी तरतुद उपलब्ध करुन युवक कल्याण योजना सुरु करुन स्वयंसेव संस्थांकडून प्रस्तावाची मागणी करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन जिल्हा क्रीडा धिकारी यांना देण्यात यावे. जेणेकरुन जिल्हयातील स्वयंसेवी संस्थांना न्याय मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे.


                निवेदनावर स्व. तुळशिरामजी बहुू. विकास कल्याणकारी संस्था, म. ज्योतीबा फुले बहूउद्देशिय संस्था उमरा, पंचशिल शिक्षण संस्था कळंबा बोडखे, स्वामी विवेकानंद सामाजीक संस्था शिरपुर जैन, गजानन माऊली महिला संस्था मालेगाव, भगवानबाबा शिक्षण प्रसारक संस्था देपुळ, साईप्रेरणा सामाजीक संस्था, त्रिरत्न महिला संस्था तांदळी शेवई, प्रेरणा अल्पसंख्यांक संस्था पांगरी धनकुटे, लोकसेवा सांस्कृतीक नाट्यमंडळ गोहोगाव हाडे, स्व. जयराम नाईक मागासवर्गीय शिक्षण संस्था सुदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था खडकी, प्रज्ञासुर्य शिक्षण संस्था जऊळका रेल्वे, मानव बहूउद्देशिय संस्था नालंदानगर, छत्रपती शाहू महाराज सांस्कृतीक डव्हा, छत्रपती संभाजी शिक्षण प्रसारक संस्था अनसिंग, विश्वकर्मा शिक्षण संस्था कळंबेश्वर, हजरत उमरफारुख अल्पसंख्यांक संस्था शिरपुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा संस्था शिरपुटी आदी संस्थाचालकांच्या सह्या आहेत.


जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांचा फोन ‘नॉट रिसीव्ह’
 स्वयंसेवी संस्थांच्या तक्रारीसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी न उचलल्यामुळे त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत.