Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम टनका येथील ग्रामसेवक धम्मानंद भगत यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार


ग्राम टनका येथील ग्रामसेवक धम्मानंद भगत यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित : विविध विकासकार्याची दखल
वाशीम - ग्राम विकास विभागाच्या यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत दरवर्षी ग्रामस्तरावर उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामसेवकांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. याअंतर्गत जिल्हयातील टनका येथील ग्रामसेवक धम्मानंद भगत यांच्या कार्याची दखल घेत गुरुवार, 12 मार्च रोजी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेले धम्मानंद भगत हे जिल्हयातील एकमेव ग्रामसेवक आहेत.
 मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य ग्रामविकास तथा महसूलमंत्री अब्दुल सत्तार, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांच्या हस्ते ग्रामसेवक धम्मानंद भगत यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) इस्कापे, राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशातं जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, प्रसिध्दीप्रमुख बापु अहीरे, विभागीय पदाधिकारी चांद कुरेशी, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे, जिल्हा सचिव अरुण इंगळे यांच्यासह जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते. ग्रामसेवक धम्मानंद भगत हे सन 2009 साली वाशीम तालुक्यातील ईलखी येथे रुजु झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात गाव पांदनमुक्त केले. सन 2016 पासून टनका येथे रुजु झाल्यानंतर सरपंच शरद गोदारा, उपसरपंच सुनिल इंगोले व सर्व गावकर्‍यांच्या सहकार्याने टनका गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून दिला. तसेच ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन मिळवून दिले. करवसुली, वृक्षलागवड, घरकुल योजना, शौचालय बांधकाम व इतर विकास योजनेमध्ये दिलेले लक्षांक विविध मुदतीत पुर्ण केले. गावात सांडपाणी व्यवस्थापन, शुध्द पाण्याचा प्रकल्प इत्यादी नाविण्यपुर्ण योजनांची अंमलबजावणी करुन गावात ठिकठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सर्व कार्याची दखल घेवून ग्रामसेवक धम्मानंद भगत यांना सन 2018-19 च्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.