Ticker

    Loading......

टाळीनाद, थाळीनाद व शंखनाद करुन वाशीमकर जनतेने डॉक्टर, नर्सेस व पोलीसांचे मानले आभार


टाळीनाद, थाळीनाद व शंखनाद करुन वाशीमकर जनतेने डॉक्टर, नर्सेस व पोलीसांचे मानले आभार
जनता कर्फ्युमध्ये सकाळी 5 पर्यत वाढ
महाराष्ट्रात कलम 144 जमावबंदी लागु
वाशीम - देशभर कोरोना विषाणूचे संकट गहीरे झाले असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रविवार रोजी जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यु’ ला वाशीमकर जनतेने उस्फुर्त प्रतिसाद देवून सकाळी 7 वाजतापासून आपल्या घराबाहेरच राहणे पसंत केले. त्यामुळे एरवी गजबजलेल्या पाटणी चौकासह संपूर्ण वाशीम शहरामध्ये स्मशान शांतता पसरली होती. यादरम्यान जनता कर्फ्यु काळात आपातकालीन व संकटकालीन सेवेसाठी अविरतपणे परिश्रम करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस बांधव व भगिनी, होमगार्ड, स्वयंसेवक व पत्रकार यांच्याप्रती आपली कृतज्ञता व आभार म्हणून सायंकाळी 5 वाजता वाशीम शहरातील जनतेने आपआपल्या घरासमोर व गच्चीवर उभे राहून एकत्रितपणे व लयबध्दरित्या 15 मिनीटे टाळीनाद, थाळीनाद व शंखनाद केला. या बंद काळात आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी लोकांनी स्वत:हून  आपल्या घरात राहणे पसंत केले. तर हा बंद यशस्वी व्हावा म्हणून पोलीस बांधवांनी डोळ्यात तेल घालून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. 
 दरम्यान या जनता कर्फ्युमध्ये 23 मार्चच्या सकाळी 5 पर्यत वाढ करण्याचा करण्याचा निर्णय होण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 हा जमावबंदीचा कायदा लागु करण्यात आला असून 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या काळात बँका, किराणा, धान्य, भाजीपाला दुकाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच धान्याची आवक सुरु राहील. असे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
 वाशीम शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्येही गावकर्‍यांनी आपआपली दुकाने, प्रतिष्ठाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. व आपली देशभक्तीची भावना प्रगट केली. नागरीकांच्या या एकजुटीच्या भावनेमुळे कोरोनाच काय कोणतेही संकट या भारत देशावर जास्त काळ आपले वर्चस्व दाखवू शकणार नाही. या भारत देशातील संपुर्ण जनता हा देश म्हणजे आपले एक घर व एक परिवार समजून स्वयंस्फुर्तीने पाळलेल्या या बंदमुळे लवकरच कोरोनाचे संकट या भारत देशातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही अशी भावना नागरीकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान नागरीकांनी आगामी 31 मार्च पर्यत अशीच एकजूट दाखवून आपआपल्या घरातच राहावे, गर्दी करु नये व आपल्या रक्षणासाठी झटणारे प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाला मदत करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सर्व आबालवृध्द, तरुण, तरुणी एवढेच काय तर लहान बालक, बालीकांनी सुध्दा एकत्रितपणे आपआपल्या घराजवळ टाळ्या वाजवून डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.