काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बंजारा समाजातील नेते व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.
मुंबई, दि. २८ फेब्रुवारी.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी भवन येथे बंजारा समाजाचे नेते व कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यभरातून आलेल्या बंजारा समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या बैठकीला माजी आमदार धोंडीराम राठोड, संजय राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बंजारा समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक समस्यांवरही थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने रहात असून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी थोरात यांना निवेदन देण्यात आले. तांड्यांना महसुली गावाचा दर्जा देणे, तांडा तिथे शेतमाल साठवण्यासाठी गोदाम, तांड्याच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देणे, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेचे रुपांतर तांडा डेव्हलपमेंट ऍथोरिटीमध्ये करुन त्यास महामंडळाचा दर्जा द्यावा, वसंतराव नाईक विकास महामंडळाला दरवर्षी ३०० कोटी रुपयाचा निधी देऊन बंजारा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
बंजारा सन्मान रॅली आयोजित करण्यात येणार असून ५ एप्रिल २०२० रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ही रॅली होत आहे. या रॅलीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
बंजारा समाज कायमच काँग्रेस पक्षासोबत राहिला आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार बंजारा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे थोरात म्हणाले.